24 October 2020

News Flash

अल्बर्ट आइनस्टाइनसोबत असणारी ही मराठमोळी व्यक्ती कोण ओळखलंत का?

या फोटोतील व्यक्तीबद्दल जाणून तुम्हालाही अभिमान वाटेल

(फोटो सौजन्य: Twitter/AlbertEinstein वरुन साभार)

महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे हे सर्वांनाच परिचयाचे आहेत. रत्नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. ते स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक होते. मात्र त्याचबरोबर त्यांना गणिताची आवड होती. याच आवडीमुळे त्यांना गणित विषयासंदर्भातील क्षेत्रामध्ये मोठा मान होता. याचीच प्रचिती देणारा एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरलाय.

सापेक्षतावादाच्या सिद्धांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा फोटो ट्विट करण्यात आलाय. आइनस्टाइन यांचे हे अकाऊंट अधिकृत आहे. १९५५ सालीच आइन्सटाइन यांचा मृत्यू झाला असला तरी त्यांच्या आठवणींचे जतन करण्यासाठी त्यांच्या वारसांकडून हे अकाऊंट चालवलं जातं. याच अकाऊंटवरुन गुरुवारी #ThrowbackThursday या हॅशटॅग अंतर्गत त्यांच्या कर्वेंबरोबरच फोटो पोस्ट करण्यात आला. “अल्बर्ट आइन्स्टाइन आणि भारतीय प्राध्यापक धोंडो केशव कर्वे १९२० च्या उत्तरार्धात काढलेल्या एकाच फोटोमध्ये,” अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे.

हा फोटो २४ तासांमध्ये दीड हजारहून अधिक लोकांनी रिट्विट केला असून नऊ हजारांहून अधिक जणांनी लाईक केला आहे. दोघांना गणित आणि भौतिक शास्त्राची आवड होती या साधर्म्याबरोबरच आणखीन एक विचित्र योगायोग कर्वे आणि आइनस्टाइन यांच्यामध्ये आहे. आइनस्टाइन यांचा मृत्यू १८ एप्रिल १९५५ रोजी अमेरिकेतील न्यू जर्सी येथे झाला. याच दिवशी कर्वे यांचा ९७ वा वाढदिवस होता. आइनस्टाइन यांच्या मृत्यूनंतर सात वर्षांनी म्हणजे ९ नोव्हेंबर १९६२ रोजी कर्वे यांचे पुण्याने वृद्धापकाळाने निधन झाले.

नक्की पाहा >> US Elections: एक कुलकर्णी अमेरिकत लढतोय निवडणूक; महाराष्ट्रातील नेत्याशी आहे खास नातं

कर्वे यांना स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक म्हणून ओळखले जाते. इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. त्यांनी एसएनडीटी या महिला महाविद्यालयाचीही स्थापन केली होती. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून १९५८ साली वयाच्या १००व्या वर्षी त्यांना भारतरत्न या सर्वोच्च किताबाने गौरविण्यात आले होते.

कर्वे आणि गणित

रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे कर्वेंचे मूळ गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली.इ.स. १८८१ मधे मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मुंबईच्या एल्फिन्सटन कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली.वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला.त्याच वर्षी कर्वेंनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे इ.स. १९१४पर्यंत त्यांनी ही नोकरी केली. कर्वे गणिती होते. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत ते उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी कर्वेंना बोलावून घेतले. इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात कर्वेंनी गणित हा विषय शिकवला.

पुनर्विवाह

वयाच्या १४ वर्षीच कर्वेंचे लग्न झाले होते. इ.स. १८९१ मध्ये त्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या. त्या वेळी कर्वेंचे वय पंचेचाळीसच्या आसपास होते. प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेहीअल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती. लहान वयात मुलींची लग्न होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे. ही समाज रीत नाकारणाऱ्या कर्वेंनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. कर्वें पत्नीसह मुरूडला गेल्यानंतर कर्वेंवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. कर्वेंच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता.

सहा एकरांची जागा आणि पहिलीवहिली स्त्रीशिक्षण संस्थेची स्थापना

कर्वेंचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती. घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे, इ.स. १८९४ या दिवशी कर्वेंनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास कर्वेंनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते. बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या अनिकेत स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून इ.स. १८९६ मध्ये कर्वेंनी सहा विधवा महिलांसह ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला. ‘विधवा विवाहोत्तेजक‘ मंडळाची स्थापना केली. रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी कर्वेंचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि रु. ७५० संस्थेच्या उभारणीसाठी कर्वेंकडे सुपूर्द केले. या उजाड माळरानावर कर्वेंनी एक झोपडी बांधली. ही पहिलीवहिली झोपडी ही हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री. आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभवसमृद्ध परिसरात कर्वेंची झोपडी त्यांच्या तपाचे महाभारत जगाला सांगत उभी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 2:26 pm

Web Title: albert einstein and indian professor dhondo keshav karve scsg 91
Next Stories
1 …म्हणून आनंद महिंद्रा बासरीवाल्याकडून दर रविवारी एक बासरी विकत घेऊन तोडायचे
2 जगभरात ट्विटर डाऊन, अनेक युजर्सला फटका
3 “चना मसाला आणि नान खाण्यासाठी मी कायमच…”; ‘या’ देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी शेअर केला थाळीचा फोटो
Just Now!
X