जगातील प्रत्येक देशातील खाद्यसंस्कृतीत विविधता आढळते. प्रत्येक देशात पिकणारी फळं, भाज्या, धान्य तसेच प्राणी, मासे यांचा प्रामुख्यानं त्या आहारात समावेश केला जातो. याच बळावर काही देशांच्या खाद्यसंस्कृती अनेकांचं लक्षही वेधतात. असाच एक देश म्हणजे जपान. विविध नावाचे, रंगांचे आणि बहुविध घटकांपासून तयार होणारे खाद्यपदार्थ हे जपानच्या खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य. पण, हा देश एका एका माशामुळे चर्चेत आलाय. ज्या माशामुळे चक्क जपानमधील एका शहरात अलर्ट जारी केला आहे.

एका सुपर मार्केटमधून अनावधानानं साफ न केलेले ‘फुगू’ मासे विकले गेले. या सुपर मार्केटमधून पाच फुगू माशांच्या पॅकेटची विक्री करण्यात आली होती. पण, आता मात्र ज्या ग्राहकांनी हे मासे खरेदी केले असतील त्यांनी तातडीनं ते परत करण्याचे आवाहन लाऊडस्पीकर, वर्तमानपत्र आणि रेडिओवरुन करण्यात येत आहे. शहरात करण्यात आलेल्या या आवाहनामुळे विकल्या गेलेल्या ३ फुगू माशांचे पॅकेट्स परत मिळवण्यात यश आलं आहे तर उर्वरित दोन पॅकेट्सचा शोध सुरु आहे.

फुगू हे मासे जगातील विषारी माशांच्या प्रजातींमध्ये मोडतात. त्यामुळे हा मासा नीट साफ केला नाही आणि विषाचा एक कण जरी राहिला तर खाणाऱ्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या माशात असणाऱ्या विषामुळे पक्षाघाताचा झटका येऊ वेळप्रसंगी मृत्यूही ओढावू शकतो. कधी कधी फुगूमुळे माणूस कोमातही जाऊ शकतो. म्हणूनच हा मासा जितका चविष्ट आहे तितकाच तो घातकही आहे. पण, असं असलं तरी फुगूपासून तयार करण्यात आलेला ‘साशिमी’ हा पदार्थ जपानमध्ये भलताच लोकप्रिय आहे. यात फुगू मासा कागदाइतका पातळ कापला जातो. या माशाच्या यकृत आणि त्वचेमध्ये विषारी घटक असतात म्हणूनच हा मास व्यवस्थित साफ करावा लागतो. सायनाईडपेक्षाही फुगूमध्ये १२०० पटींनी अधिक विषारी घटक असतात. एक फुगू मासा ३० लोकांचे जीव घेऊ शकतो. तरीही फुगू मासा आणि त्यापासून तयार करण्यात आलेला पदार्थ हा जपानमधला सर्वात महागडा पदार्थ आहे. हिवाळ्यात फुगू उपलब्ध असतात.

फुगू मासा साफ करण्यासाठी खास प्रकारचं प्रशिक्षण घेतलं जातं. फार कमी शेफना फुगू मासा साफ करण्याची कला अवगत आहे, या माशापासून पदार्थ तयार करण्यासाठी या शेफना परवाना मिळवणं अनिवार्य आहे. फुगू खाऊन दगावल्याच्या अनेक घटना जपानमध्ये घडल्या आहेत असं असलं तरी या माशाची लोकप्रियता तीळमात्रही कमी झाली नाही.