वर्षाला ६० ते ७० लाख कमवणारा कचोरीवाला आयकर विभागाच्या रडारावर आला आहे. कचोरीवाल्याची वर्षिक कमाई पाहून आयकर खात्याला जाग आली. त्यानंतर आयकर विभागाने कचोरी वाल्याला नोटीस पाठवली आहे. अलीगढमधील छोट्याशा गल्लीमध्ये कचोरी विकणारा मुकेश कुमार या व्यावसायीकाची वार्षिक उलाढाल तब्बल ६० लाखांपेक्षा जास्त आहे. पण त्याने अद्याप एक रुपयांचाही कर कधीच सरकारकडे भरलेला नाही.
अलीगढ आयकर विभागाला मुकेश कुमार यांच्या लाखोंच्या उलाढालीविषयी माहिती मिळाली. मुकेश दररोज कचोरीच्या व्यावसायातून हजारो रूपयांची कमाई करत असल्याचे कर आधिकाऱ्यांना समजले होते. त्यानंतर आयकर विभागाने मुकेशच्या छोट्या दुकानावर छापा टाकला. या छाप्यामध्ये व्यावसायीक मुकेश कुमार लखपती असल्याचे निदर्शनास आले. पण त्याने अद्याप वस्तू व सेवा कर नोंदणी क्रमांकही घेतलेला नसल्याचे दिसून आले. कारवाईनंतर आयकर विभागाने मुकेशला नोटीस पाठवली आहे.
अलीगढमध्ये सीमा टॉकीजजवळ गेल्या दहा ते १२ वर्षांपासून मुकेश कुमार कचोरी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. सुरुवातीला आम्ही मुकेशच्या दुकानावर नजर ठेवली होती. दुकानात नेमका किती व्यावसाय होते याची माहिती आम्हाला पाहिजे होती. त्याची वार्षिक उलाढाल आणि नोंदणी क्रमांकही नसल्याचे समजल्यावर आम्ही छापा मारला. कारवाई दरम्यान मुकेश कुमार यांनी स्वतःच ते दिवसाला किती रुपये कमावितात, याची माहिती दिल्याचे अलीगढचे व्यावसायिक कर विभागाचे उपायुक्त रविंद्रपाल सिंग यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 26, 2019 9:34 am