‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन’ प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे हे दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आलेत. या दौऱ्यात शिंझो यांच्यासोबत पत्नी अकी आबेदेखील भारतामध्ये आल्या आहेत. काल रोड शो दरम्यान त्यांनी भारतीय पेहरावातील अकी यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. साहजिकच आता अनेकजण अकी यांच्याविषयी आणखी काही गोष्टी जाणून घेण्यास उत्सुक आहेत.

वाचा : गरिब घरातील हुशार मुलगा, जपानचा जावई ते बुलेट ट्रेनचा मुख्य सल्लागार! संजीव सिन्हांचा थक्क करणारा प्रवास

जपानची फर्स्ट लेडी असणाऱ्या अकी यांची जपानमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख आहे. जपानमध्ये नव्वदीच्या दशकात अकी या रेडिओ जॉकी म्हणून कमालीच्या लोकप्रिय होत्या. श्रोते त्यांना ‘अक्की’ या टोपणनावाने ओळखत. अकी यांचा जन्म एका सधन कुटुंबात झाला. . त्यांचे वडिल जपानमधल्या प्रसिद्ध कंपनी ‘मोरिनगा अँड कंपनी’ चे अध्यक्ष होते. १९८७ मध्ये त्या आबेंशी विवाहबद्ध झाल्या.  अकी या सोशल मीडियावर सक्रीय असतात. यापूर्वी कोणत्याही जपानी पंतप्रधानांच्या पत्नी सोशल मीडियावर इतक्या सक्रीय नव्हत्या. समाजकार्यातला त्यांच्या सहभाग मोठा आहे. समलैंगिक संबंधांना पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी मांडली. फक्त समाजकार्यच नव्हे तर पर्यावरणविषयक समस्यांविषयक जनजागृती करण्यात त्या आघाडीवर असतात. याशिवाय, त्यांना सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचीही आवड आहे. मध्यंतरी सोशल मीडियावर शेतात यंत्राद्वारे जमीन नांगरतानाचा त्यांचा फोटोदेखील व्हायरल झाला होता.

वाचा : मेंदूवरील शस्त्रक्रियेदरम्यान ती खेळत होती मोबाईल गेम