मेकअप फक्त मुली करतात, गुलाबी रंगाचे कपडे फक्त मुलीच घालतात, घरची कामं फक्त बायकांनीच करायची असतात…. असे कितीतरी पूर्वग्रह आपल्या समाजात आहेत. काही बदल स्विकारण्यात आपण अजूनही मागे आहोत. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही पोस्ट पाहिली तर आपण अजूनही बुरसटलेल्या विचारांच्या जाळ्यात अडकून पडल्याची तीव्र जाणीव होते. अलाहाबादमध्ये राहणाऱ्या दिक्षा बिजलानी या तरुणीनं एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

दिक्षाच्या नऊ वर्षांच्या चुलत भावाला मेकअप करायला आवडतं. आईसारखी ओठांवर लिपस्टिक लावणं, नखांना नेलपेंट लावणं किंवा मेकअप करणं त्याला खूप आवडतं. इतकंच नाही तर मुलीसारखं स्कर्ट घालायलाही त्याला आवडत असल्याचं दिक्षानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. पण या सगळ्या कारणांमुळे या छोट्या मुलाची मात्र अनेकांनी खिल्ली उडवली आणि हे खूपच चुकीचं असल्याचं तिनं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

केवळ तो मुलींसारखा मेकअप करतो, लिपस्टिक लावतो म्हणून अनेकांनी तृतीयपंथी म्हणून त्याला हिणवलं. या सगळ्या हिणवण्याचा त्याच्या बालमनावर किती परिणाम झाला याची कल्पना करा. त्याची थट्टा करायला सुरूवात केल्यानंतर तो नेहमी पडद्यामागे, बेडखाली लपायचा. इतकंच नाही तर त्यानं फोटो काढायलाही नकार दिले होते. मग त्याच्या मनातली भीती घालवण्यासाठी घरातील भावांनी मेकअप करुन त्याच्यासोबत फोटो काढायचं ठरवलं.

त्याच्यासारख्या मुलांना मोकळा श्वास घेता येईल, मुक्तपणे जगता येईल असं वातावरण निर्माण करणं ही आपली जाबबदारी आहे. अशा मुलांना आहे तसं आपण स्विकारलं पाहिजे’, त्यांना हिणवण्यापेक्षा त्यांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण करणं ही देखील आपली जबाबदारी असल्याचं तिनं या पोस्टमधून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा विषय तिनं ज्या पद्धतीनं मांडला आहे त्यामुळे फेसबुकवर या पोस्टची चर्चा सुरू आहे.