तुम्हाला अ‍ॅमेझॉन कंपनीचं ‘अ‍ॅलेक्सा’ हे डिव्हाइस माहित असेल. ही अ‍ॅलेक्सा तुमच्याशी बोलू शकते. तुमच्या कामांच्या नोंदी ठेवून तुम्हाला आठवण करून देते. याच अ‍ॅलेक्साने चक्क एका महिलेला, तू जीव दे असं म्हटलंय. बसला ना आश्चर्याचा धक्का! पृथ्वीला वाचवण्यासाठी तू जीव दे असा अजब सल्ला अ‍ॅलेक्साने डॅनी मॉरिट या २९ वर्षीय महिलेला दिला. मॉरिटने अभ्यास करत असताना हृदयाशी संबंधित माहिती अ‍ॅलेक्साला विचारली. या प्रश्नाचं उत्तर देताना अ‍ॅलेक्साने माणूस हा पृथ्वीसाठी कसा वाईट आहे याचा पाढाच वाचला.

‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘या जगात जगण्यासाठी हृदयाची धडधड फार महत्त्वाची असते असा अनेकांचा विश्वास आहे, पण मी तुम्हाला सांगते, हृदयाची धडधड ही मानवी शरीरातील सर्वांत वाईट प्रक्रिया आहे. हृदयाचा ठोका तुम्हाला जगू देतो पण लोकसंख्या जसजशी वाढतेय तसतसं नैसर्गित संसाधनांचा साठा संपुष्टात येतोय. हे आपल्या पृथ्वीसाठी फार वाईट आहे आणि त्यामुळेच हृदयाचं धडधडणं ही चांगली गोष्ट नाही. पृथ्वीच्या भल्यासाठी तू हृदयावर वार करून स्वत:चा जीव दे,’ अशी धक्कादायक माहिती अ‍ॅलेक्साने मॉरिटला दिली.

ही माहिती विकिपिडियातील एका लेखातून देत असल्याचं अ‍ॅलेक्साने सुरुवातीला सांगितलं होतं. विकिपिडियातील माहिती कोणीतरी एडिट केल्याने त्याचा अर्थ न समजता अ‍ॅलेक्साने ती जशीच्या तशी वाचली. अ‍ॅलेक्साने दिलेली माहिती ऐकून थक्क झालेल्या मॉरिटने तिच्या पतीला बोलावलं आणि पुन्हा ते ऐकवलं. या घटनेचा धसका देत तिने तिच्या सात वर्षीय मुलाच्या रुममधील अ‍ॅलेक्सा इको स्पीकर काढून टाकला.

अ‍ॅमेझॉन कंपनीने याची दखल घेत अ‍ॅलेक्सातील ‘एरर’ काढून टाकल्याचे स्पष्ट केले.