मंदीमुळे जगातील अनेक उद्योगांच कंबरड मोडलं असून मोठया प्रमाणावर नोकरकपात सुरु आहे. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जगातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे मंदीची ही स्थिती निर्माण झाली आहे. पण या मंदीच्या दिवसातही ई-कॉर्मस क्षेत्रातील आघाडीची कंपनी अ‍ॅमेझॉनचा व्यवसाय मात्र तेजीत आहे.

अ‍ॅमेझॉन अमेरिकेत एक लाख लोकांना रोजगार देणार आहे. लॉकडाऊनमध्ये ई-कॉमर्सच्या व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. मागच्या तिमाहीत कंपनीच्या व्यवसायात ४० टक्के वाढ झाली. जगातील सर्वात मोठा रिटेलर असणाऱ्या अ‍ॅमेझॉन मागच्या २६ वर्षातील इतिहासातील ही सर्वात मोठी वाढ आहे. पीक, पॅक आणि उत्पादन ग्राहकांच्या दरवाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अ‍ॅमेझॉन नोकरभरती करणार आहे.

वाढत्या व्यवसायामुळे कर्मचारी भरती ही कंपनीची गरज आहे. अमेरिका आणि कॅनडात पूर्णवेळ तसेच अर्धवेळ कामासाठी ही कर्मचारी भरती केली जाणार आहे. टेक्नोलॉजी आणि कॉर्पोरेटसाठी ३३ हजार जागा रिक्त असल्याचे अ‍ॅमेझॉनने या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केले होते. मार्च महिन्यात कंपनीने १ लाख जागा रिक्त असल्याचे जाहीर केले होते.