हल्ली ई-कॉमर्स वेबसाईटवरून वस्तूंची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. घरबसल्या एका क्लिकवर ग्राहकांना अनेक वस्तू खरेदी करता येणं शक्य झालं आहे. ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन नेहमीच अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटनं वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. यावेळी अॅमेझॉन आपल्या ‘प्राईम कस्टमर’साठी नवी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ‘अॅमेझॉन की’ असं या नव्या सेवेचं नाव आहे. या सेवेमुळे अॅमेझॉनच्या काही खास ग्राहकांना त्यांच्या अनुपस्थितीतदेखील वस्तू घरपोच मिळणार आहे.

Video : अपघात टाळण्यासाठी त्यांनी लढवली नामी शक्कल

अनेकदा दिलेल्या पत्त्यावर पोहोचल्यानंतर घरात कोणीच नसल्यानं डिलिव्हरी बॉईजना पार्सल घेऊन परतावं लागत. अनेक जण कामावार किंवा बाहेरगावी गेलेले असतात त्यामुळेही वस्तूंची डिलिव्हरी मिळायला उशीर होतो. या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून अॅमेझॉननं ‘अॅमेझॉन की’ सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांच्या अनुपस्थितीत अॅमेझॉनचे डिलिव्हरी बॉय त्यांचे घर उघडून वस्तू सुरक्षित ठेवू शकणार आहेत. या सेवेच्या लाभार्थींना एक ‘की-सेट’ पुरवण्यात येईल. यात कॅमेरा आणि लॉक यासारख्या वस्तू असतील. जेणेकरून डिलिव्हरी बॉय घर उघडून घरात वस्तू सुरक्षित ठेवू शकतील. अर्थात घराचे दरवाजे उघडणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या हालचालींवर ग्राहकाला लक्षदेखील ठेवता येणार आहे. ८ नोव्हेंबरपासून ही सेवा सुरू होणार आहे.