अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये राहणाऱ्यांना मगर दिसल्यास फारसं विशेष वाटत नाही. मात्र येथील सारासोटामध्ये एका कुटुंबाला तेव्हा धक्का बसला ज्यावेळी त्यांच्या घऱाच्या दरवाजावर चढणारी मगर त्यांना दिसली. दरवाजाच्या अर्ध्याहून अधिक उंचीपर्यंत ही मगर चढली होती. संपूर्ण कुटुंब घरामधून दरवाजावर चढण्याचा प्रयत्न करत असलेल्या या मगरीला पाहत होते तेव्हा त्यांच्या घरातील मांजर मात्र दरवाजाच्या जवळ बसून मगरीच्या हलचालींकडे शांतपणे बघत होती. दरवाजावर चढणाऱ्या मगरीकडे ही मांजर एकटक पाहत असल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

एवढ्या मोठा आकाराची मगर अवघ्या काही फुटांवर दरावर चढण्याचा प्रयत्न करत असतानाच दरवाजाच्या पलीकडे म्हणजेच घरात मांजर मात्र मगरीचे हे प्रयत्न पाहत शांतपणे बसली होती. घरातील लोकांनाही मांजरीचे हे साहस पाहून आश्चर्य वाटलं. त्यामुळे त्यांनी या मांजरीचा फोटो काढला आणि सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केला. या फोटोमध्ये मांजर अगदी समोर काही विशेष घडत नसल्याप्रमाणे न घाबरता दारापासून काही अंतरावर बसल्याचे दिसत आहे.

“सारासोटा, फ्लोरिडामध्ये आमचा मित्र राहतो. त्याच्या घराच्या दरवाजाजवळ आवाज आल्याचे लक्षात आल्यानंतर तो तिकडे गेला असता त्याला काय दिसलं बघा. आश्चर्यकारक आहे हे,” अशा कॅप्शनसहीत इलिनॉयसमधील एड वेर्डेल याने हा फोटो पोस्ट केला आहे.

हा फोटो एक लाख दोन हजारहून अधिक जणांनी शेअर केला आहे. त्यावर चार हजार ९०० हून अधिक प्रतिक्रिया आहेत. फ्लोरिडा सरकारकडील आकडेवारीनुसार राज्यात एकूण १३ लाख मगरी आहेत. अनेकदा या मगरी स्थानिकांना दिसतात. मगरी या सामान्यपणे सहा फुटांहून अधिक लांब असतात. त्या ५० वर्षांपर्यंत जगू शकतात. तलाव, नद्या, गोड पाण्याचे साठे, दलदल आणि अगदी समुद्रातही त्या राहू शकतात. फ्लोरिडामध्ये मगरी मारण्यावर प्रतिबंध आहे.