अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी शपथ घेतली. आता ख-या अर्थाने अमेरिकेत ‘ट्रम्पकाळ’ सुरू झाला. प्रचारसभेच्या वेळी ट्रम्प यांनी अनेक मुस्लिमविरोधी विधाने केली होती. त्यांच्या अनेक ट्विट्स आणि भाषणांतून मुस्लिमद्वेष जगाने पाहिला होता. त्यातून अमेरिकेत राहणा-या मुस्लिमांना ट्रम्प यांच्या विजयाने भविष्याविषयी भिती सतावू लागली आहे. अशातच एका पत्राचा फोटो व्हायरल होत आहे.

वाचा : जेव्हा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शपथविधीसाठी भाषण लिहितात

धर्मद्वेषाचे राजकारण जगाला काही नवे नाही. ज्यांच्या हातात सत्तेची सुत्रे तो अल्पसंख्यांकांना डिवचणार हा इतिहास जगाला नवा नाही. त्यातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अनेकदा आपल्या प्रचारातून मुस्लिम विरोधी वक्तव्ये केली होती. म्हणूनच अमेरिकन जनतेत हा मुस्लिमद्वेष फोफावत जाईल अशी भिती इथल्या मुस्लिमांना वाटली तर नवल वाटायला नको. मध्यंतरीच्या काळात ट्रम्प यांच्या विजयाने अनेक मुस्लिम आपल्या मायदेशी परतले असल्याच्या बातम्याही व्हायरल होत होत्या. काही दिवसांपूर्वी येथे मुस्लिमांवर हल्ले झाले अशाही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या, त्यामुळे इथल्या मुस्लिम समाजाला एक अनामिक भिती वाटत आहे. अशातच ओहिओ येथे राहणा-या एका मुस्लिम व्यक्तीने एका पत्राचा फोटो शेअर केला आहे. कोणीतरी त्यांच्या पत्रपेटीत एक पत्र ठेवले होते. ‘आतापासून ट्रम्पचा काळ सुरू झाला आहे. त्यामुळे कदाचित आजूबाजूची परिस्थिती येणा-या काळात बदलेल. पण काही झाले तरी तुमच्या हक्कासाठी तुमचे शेजारी नक्कीच लढतील. जर कधीही गरज लागली तर संकोच न बाळगता मदतीसाठी आमच्याकडे यावे’ अशा आशयाचे पत्र अबुबकर आम्री यांच्या पत्रपेटीत कोणीतरी ठेवले होते.

VIDEO: मुशर्रफ यांची ‘दिल्लीवाली गर्लफ्रेंड’

अबुबकर यांना देखील इतर मुस्लिम अमेरिकनप्रमाणे आपल्या भविष्याची चिंता लागली होती. ट्रम्प यांचा मुस्लिमद्वेष सर्वज्ञात आहेत. आता राष्ट्राध्यक्ष पदाची सुत्रे हातात आल्यानंतर आपले काय होईल या भितीने ते चिंतीत होते. पण दुस-याच दिवशी त्यांच्या पत्रपेटीत अनपेक्षित पत्र येऊन पडल्याने त्यांना सुखद धक्का बसला. ही अमेरिकेची दुसरी बाजू असून आपल्या हक्कासाठी आता आपले शेजारी आपल्या सोबत असल्याचे समाधान अबुबकर यांना आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून अबुबकर अमेरिकत राहत आहेत. शेजा-यांशी एकमेकांना अभिवादन करण्यापलिकडे आपला कधी संबंध आलाच नसल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे त्यांच्यासाठी हे पत्र खूपच महत्त्वाचे ठरले. शेजा-यांनी लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.