अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा धावपटू गील रॉबर्टस मध्यंतरी उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने यासंदर्भात गील रॉबर्टसने दिलेले काहीसे विचित्र स्पष्टीकरण मान्य करत त्याची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.

गील रॉबर्टसने २०१६ च्या समर ऑलिम्पिकमध्ये रिले शर्यतीती सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या उत्तेजक चाचणीत तो दोषी आढळला होता. त्यामुळे २०२० साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यास त्याला बंदी घालण्यात होती. या निर्णयाविरोधात गील न्यायालयात गेला. यावेळी त्याने आपल्या रक्तात उत्तेजक घटक कसे आले, याबद्दल स्पष्टीकरण दिले. गिलची प्रेयसी अॅलेक्स सलजार हिला सायनसचा त्रास असून तिच्यावर गेल्या काही दिवसांपासून औषधोपचार सुरू आहेत. माझ्या गेल्या शर्यतीच्यावेळीही ती सायनसवर औषधं घेत होती. त्यावेळी मी तिचे दीर्घ चुंबन घेतले होते. चुंबन घेताना आमच्या जिभेचा स्पर्श एकमेकांना झाल्यामुळे औषधाचा काही अंश माझ्या शरीरात गेला. त्यामुळेच उत्तेजक चाचणीत मी दोषी आढळलो, असा युक्तिवाद गीलने न्यायालयात केला होता.

यावेळी गीलची प्रेयसीही न्यायालयापुढे हजर झाली होती. तिने साक्ष देताना म्हटले की, मी परिवारासोबत भारताच्या दौऱ्यावर गेले असताना माझी तब्येत प्रचंड बिघडली. तिथून परतल्यानंतर पुढील १४ दिवसांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानं मी अँटिबायोटिक्स औषधे घेत होते. त्या गोळ्यांमधील ड्रग्सचा अंश गिलच्या शरीरात सापडला असावा, असे अॅलेक्स सलजार हिने सांगितले. विशेष म्हणजे न्यायालयानेही गीलचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत या प्रकरणातून त्याची निर्दोष सुटका केली.