करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कठोर निर्बंधांमुळे व्हिडीओ कॉलवरुन लग्न, मोजक्या उपस्थितांच्या हजेरीत लग्न असं तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल पण अमेरिकेमध्ये याच निर्बंधांमुळे चक्क दोन देशांच्या सीमेवर लग्न लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. बरं हे लग्न असं दोन देशांच्या सीमेवर लागवण्याचं कारण म्हणजे वधू आणि वर दोघांच्याही नातेवाईकांना सर्व नियमांचे पालन करुन लग्नाला उपस्थित राहता यावे.

हे आगळं वेगळं लग्न पार पडलं कॅनडामध्ये. मात्र निर्बंध असल्याने अमेरिकेतील नातेवाईक या लग्नाला उपस्थित राहू शकले नाही. म्हणूनच त्यांनी दोन्ही देशांच्या समीवेर असणाऱ्या नदीच्या पलीकडच्या तिरावर म्हणजेच अमेरिकेतील भूभागावर राहून दूरूनच वधू वरांना शुभाशिर्वाद दिले.

फोटो सौजन्य : CBC/Instagram

सीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार लिंडसे क्लॉव्हस आणि अ‍ॅलेक्स लिकी या दोघांनी सेंट क्रोइक्स नदीच्या किनारी सेंट स्टीफन येथे लग्न केलं. ख्रिश्चन परंपरेनुसार पार पडलेल्या या लग्न सोहळ्याला अमेरिकेतून म्हणजेच नदी पल्याडच्या किनाऱ्यावरुनही नातेवाईक उपस्थित होते. कॅनडातील सेंट स्टीफनच्या अगदी समोरील बाजूस असणाऱ्या नदीच्या दुसऱ्या बाजूच्या मेनी किनाऱ्यावर अनेकजण या लग्नासाठी उपस्थित होते. “मला समोर अ‍ॅलेक्स दिसत होता आणि त्याच्या मागे दूरवर माझे काही नातेवाईक दिसत होते. आमचे काही नातेवाईक अमेरिकेतून नदी किनारी उपस्थित राहून लग्नात सहभागी झालेले तर काहीजण माझ्या मागे म्हणजेच कॅनडातून उपस्थित होते,” असं लिंडसेने सीबीसी सोबत बोलताना सांगितलं.

फोटो सौजन्य : CBC/Instagram

खरं तर असं लग्न करण्याचा या दोघांचा विचार नव्हता मात्र परिस्थितीसमोर त्यांना काही करताच आलं नाही. अमेरिकेतील नातेवाईकांना दूरुन लग्न पाहता आलं मात्र त्याचबरोबर तंत्रज्ञानामुळे त्यांना लग्नातील सर्व गोष्टी आणि धार्मिक वचनेही ऐकता आल्या. आम्ही असं लग्न होईल असं कधीच ठरवलं नव्हतं. मात्र आता आम्ही आमच्या लग्नाची ही अनोखी गोष्ट आयुष्यभर नक्कीच इतरांना सांगत राहू असं लिंडसे हसत हसत सांगते. याच वर्षीच्या सुरुवातील कॅनडामध्ये सर्व नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा या दोघांचा विचार होता मात्र करोनामुळे त्यांचा प्लॅन फिस्कटला. अखेर १० महिने थांबल्यानंतर त्यांनी अशा हटके पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अमेरिकेतील करोना रुग्णांची संख्या पाहता आंतरराष्ट्रीय सीमा सध्या बंद ठेवण्यात आल्यात. विशेष परवाणगीने कॅनडात प्रवेश केल्यानंतरही दोन आठवडे क्वारंटाइन होणं बंधनकारक आहे. त्यामुळेच एवढ्या वऱ्हाड्यांना एकाच वेळी १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करणं शक्य नव्हतं. मात्र त्याचवेळी क्लॉव्हस कुटुंबाने ठरलेल्या वेळातच लग्न करण्याचा निर्धार केला होता. अखेर त्यांनी नदी किनारी लग्न करुन दोन्ही देशातील नातेवाईकांना सुरक्षितपणे लग्नात सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अमेरिकेतून मुलाकडील १५ नातेवाईक नदीकिनारी उपस्थित होते तर कॅनडातून मुलीकडील १५ जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी लग्नाला हजर होत्या.