चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने तेथील तब्बल ३३ नद्यांनी धोक्याच्या पातळी ओलांडली आहे. इतिहास पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी एवढ्या नद्या धोक्याच्या पातळी ओलांडून वाहत असल्याचे चीनच्या जलसंपदा मंत्रालयातील सहाय्यक मंत्र्याने आठवडाभरापूर्वी जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं होतं. मध्य आणि पूर्व चीनमधील अनेक प्रदेशांमधील सामान्य जनजीवन पुरामुळे विस्कळीत झालं आहे. या पुराचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. त्यातच एक व्हिडिओ खास लक्ष वेधून घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ आहे पुराच्या पाण्याने वेढलेल्या ७०० वर्षे जुन्या वास्तूचा. ही वास्तू म्हणजे बौद्ध मंदिर. सर्व बाजूने पुराचे पाणी आणि मधोमध हे मंदिर उभं असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.

नक्की पाहा हे फोटो >> चीनमधील ३३ नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; हजारो कोटींचे झाले नुकसान

हे मंदिर वुहान शहराजवळ यांगत्से नदीच्या खोऱ्यातील एका मोठ्या खडकावर बांधण्यात आलं आहे. यांगत्से या चीनमधील सर्वात मोठ्या नदीलाही पूर आला आहे. यांगत्सेच्या खोऱ्यातील आपत्कालीन यंत्रणांनी रेड अलर्ट जारी केला आहे. यांगत्सेच्या खोऱ्यामध्येच मध्य चीनमधील मोठ्या लोकसंख्येचे वास्तव्य आहे. या भागाला पुराचा मोठा फटका बसला आहे. असं असलं तरी पुराच्या या पाण्यामुळे मंदिरावर काहीच परिणाम झालेला नाही. याच मंदिराचे व्हिडिओ आणि फोटो आता चीनमध्ये व्हायरल होताना दिसत आहे.

फोटो सौजन्य: एएफपी

हे बौद्ध मंदीर साँग राजवटीच्या काळात बांधण्यात आलं. त्यानंतर युआन राजवटीच्या काळामध्ये त्याच्या जीर्णोद्धार करण्यात आला. यापूर्वीही अनेकदा यांगत्येला पूर आला तेव्हाही या मंदिराला काहीच झालं नव्हतं. १९९८ आणि २०१७ च्या पुराच्यावेळीही या मंदिराला मोठी हानी झाली नव्हती. तैवान न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार या भागातील अनेक इमारती आणि बराचसा प्रदेश पाण्याखाली गेला आहे. मात्र पुराच्या पाण्यामुळे या मंदिराला काहीही झालेले नाही.

नक्की वाचा >> आश्चर्य… नदीपात्रात सापडलं शेकडो वर्ष जुनं मंदिर

चीनमधील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत असून मागील संपूर्ण आठवडा अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलं आहे. १९६१ पासून पावसाची नोंद चीनमध्ये ठेवली जाते. तेव्हापासून आतापर्यंतच्या जवळजवळ ६० वर्षांच्या कालावधीमध्ये पहिल्यांदाच एवढा पाऊस चीनमध्ये पडला आहे.