सार्वजनिक ठिकाणी सरकते जिने हे खूपच फायद्याचे ठरतात. यामुळे ज्येष्ठांचा किंवा अपंगांचा जिने चढण्याचा त्रास खूप कमी होतो. आपल्याकडे तरूण आणि वृद्ध अशी सगळीच मंडळी या जिन्यांचा वापर करतात. पायऱ्या चढत जाण्यापेक्षा जिन्यांचा वापर सोयीस्कर वाटतो. जिने चढण्यासाठी का बरं उर्जा खर्च करायची? जिने चढण्याचे कष्ट घेण्यापेक्षा सरकत्या जिन्यानं गेलेले बरे, अशी मानसिकता लोकांमध्ये तयार झाली आहे. अनेकदा पादचारी पूल असतानाही लोक सर्रासपणे सरकत्या जिन्यांचाच उपयोग करतात. या सवयीला आळा घालण्यासाठी स्वीडनमधील मेट्रो रेल्वेच्या स्थानकावर एक अप्रतिम उपक्रम राबवण्यात आला होता.

सरकत्या जिन्याच्या बाजूला असणाऱ्या जिन्यांचं रुपांतर पिआनो बोर्डप्रमाणे करण्यात आलं. यातल्या प्रत्येक पायरीवर पाय ठेवल्यानंतर पिआनोप्रमाणे स्वर उमटतात. ही गोष्ट जशी मेट्रो स्टेशनवरच्या इतर प्रवाशांना समजली तसे ते सरकत्या जिन्याऐवजी नेहमीच्या जिन्याचा वापर करू लागले. बघता बघता ६६ % प्रवाशांनी या दुर्लक्षित जिन्याचा वापर करायला सुरूवात केली. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाच वर्षांपूर्वीचा असल्याचे समोर आले आहे. मात्र, तरीदेखील या व्हिडिओला पसंती मिळताना दिसत आहे. बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांनीही हा व्हिडिओ बघून स्वीडनमधील उपक्रमाची तारफी केली. त्यांनी हा व्हिडिओ रिट्विट करत शेअर केला आहे.