नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसांचे हाल होत आहे. जून्या नोटा बदलून घेण्यासाठी तसेच पैसे बँकेत जमा करण्यासाठी नागरिक बँका सुरू होण्याआधीच बँकेच्या बाहेर रांगा लावत आहेत. आठवडा उलटून गेला तरी बँकेबाहेरची परिस्थिती काही बदलली नाही. तासन् तास नागरिकांना बँकेबाहेर उभे राहवे लागत आहे. आतापर्यंत या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरात ३५ जणांचा जीव देखील गेला आहे. रांगेत तासन् तास उभ्या असणा-या नागरिकांना अनेक ठिकाणी सेवाभावी संस्था किंवा माणसांकडून मोफत पाणी, अन्न यांची सोय पुरवली जात आहे. या सेवेत आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी एक रिक्षाचलकही पुढे आला असून बँकेत जाणा-या नागरिकांना मोफत बँकेपर्यंत पोहचवण्याचे काम तो करत आहेत. त्याचा एका फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कर्नाटकमधल्या मंगळूर येथे राहणा-या सिद्धीकी या रिक्षा चालकाने बँकेत नोटा बदलण्यासाठी जाणा-या प्रत्येकाला विनामूल्य प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली आहे. आपल्या रिक्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेला सूचना फलक त्याने लावले आहे. दोन दिवसांपूर्वी मंगळूर येथल्या रेल्वे स्थानकावर देखील एका शीख कुटुंबाने प्रवाशांना मोफत अन्न पुरवले होते. ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर अनेकांना विविध समस्यांना समोरे जावे लागले. अशातच सुट्या पैशांचा तुटवडा आणि चलनातून नोटा बाद झाल्यामुळे अनेकांची खाण्यापिण्याची अबाळ झाली. पण काही हॉटेल मालकांनी अशातही दिलदारपणा दाखवला. अकोला जिल्ह्यातील खामगाव रस्त्यावर असणा-या मराठा हॉटेलने तर ग्राहकांना खाण्याची सोय उपलब्ध करून दिली होती तसेच खाण्याचे पैसे नंतर देण्यासही ग्राहकांना सांगितले होते. केरळच्या एका चर्चेने देखील आपली दानपेटी उघडत नागरिकांना सुटे पैसे देण्याचा उदारपणा दाखवला होता.