‘पंछी, नदिया, पवन के झोंके,
कोई सरहद ना इन्हें रोके
सरहदें इन्सानों के लिए है’
हे गाणं आपण ऐकलं असेलच. सीमा या माणसांसाठी असतात. पक्षी, प्राणी, नदी, वारा यांना कोणत्याच देशाच्या सीमा अडवू शकत नाही. व्हायरल होणाऱ्या या हत्तीच्या व्हिडिओला हे गाणं खूपच तंतोतंत लागू पडतं. या हत्तीनं चीन आणि लाओस यांच्या सीमा ओलांडत पलिकडे जाण्याचा प्रयत्न केला. पण तो आपल्यादेशाची इतका प्रामाणिक निघाला की देशाची सीमा ओलांडल्यानंतर तो दोन तासांनी परतही आला. आश्चर्य म्हणजे सीमा सुरक्षा म्हणून मधे लावलेले बॅरिकेट्स न तोडता हा शिस्तप्रिय हत्ती खाण्याच्या शोधात पलिकडे गेला आणि काही वेळानं परतही आला.

हा मजेशीर प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या हत्तीनं रात्रीच्या सुमारास चीनची सीमा ओलांडत लाओसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. सीमांच्या मधे सुरक्षा म्हणून बॅरिकेट्स लावण्यात आले होते. या हत्तीनं मोठे कष्ट घेऊन बॅरिकेट्स ओलांडले. विशेष म्हणजे आपल्यामुळे हे बॅरिकेट्स पडणार नाही ना याची त्यानं पुरेपुर काळजीही घेतली. दोन तासांनी हत्ती परतला पण यावेळी बॅरिकेट्स ओलांडण्याचं कष्ट न घेता त्यानं आपल्यासाठी सोयीचा मार्ग निवडला. त्याची ही शक्कल फारच मजेशीर होती.