महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्या दिलदारपणाची सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी एका ट्विटर युजरने त्यांना मेन्शन करत एक ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये होता एका रिक्षाचा फोटो. या रिक्षाचालकाला महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ एवढी आवडली की आपल्या रिक्षाला देखील त्याने या गाडीसारखेच मॉडीफिकेशन करून घेतले. मग काय त्याची रिक्षारुपी स्कॉर्पिओ धावू लागली रस्त्यावर. एकाला त्याचा हा वेडेपणा खूप आवडला आणि त्याच्या या डोकॅलिटीने तो प्रभावितही झाला. त्याने आनंद महिंद्रांना ट्विटरवर मेन्शन करत हा फोटो शेअर केला.

‘स्कॉर्पिओची क्रेझ भारतीयांमध्ये किती आहे हे तुम्ही पाहू शकता’ अशी ओळ लिहित त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला. विशेष म्हणजे आनंद यांनी देखील या ट्विटची लगेच दखल घेतली. त्यांनादेखील या चालकाची डोकॅलिटी एवढी आवडली की त्याने या माणसाला शोधून काढण्याचा आदेशच आपल्या कर्मचाऱ्यांना दिला. कर्मचाऱ्यांनी दीड महिन्यानंतर त्याला शोधून काढले. तर रिक्षाची स्कॉर्पिओ करणाऱ्या या रिक्षाचालकाचे नाव आहे सुनिल. तो मूळचा केरळचा. त्याच्या या स्कॉर्पिओ रिक्षाने आनंद महिंद्रा एवढे प्रभावित झाले की त्यांनी ती रिक्षा संग्रहालयात ठेवण्याची इच्छा बोलून दाखवली. तसेच या बदल्यात सुनिलला त्यांनी नवा कोरा महिंद्रा सुप्रिमो मिनी ट्रकही भेट म्हणून दिला.