करोना विषाणूने सध्या संपूर्ण देशाला विळखा घातलेला आहे. प्रत्येक दिवशी महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे सध्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे. याचसोबत कामगार, शेतकरी वर्गालाही या लॉकडाउनचा फटका बसला आहे. अशा खडतर काळातही उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक नवीन आदर्श घालून दिला आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपल्या कंपनीतील कँटीनमध्ये प्लेटऐवजी केळ्याच्या पानांचा वापर महिंद्रा यांनी सुरु केला आहे.

आनंद महिंद्रानी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली आहे. एका निवृत्त पत्रकाराने महिंद्रा यांना इ-मेल करुन ही कल्पना सुचवली होती. यावर महिंद्रा यांच्या कर्मचारी वर्गाने लगेच पावलं उचलत या प्रयोगाला सुरुवात केली आहे.

महिंद्रा यांच्या या प्रयोगाला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. सध्याच्या काळात लॉकडाउनमुळे अनेक शेतकऱ्यांना आपला माल विकण्यास अडचण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत महिंद्रा यांच्यासारख्या उद्योगपतींनी उचललेलं हे पाऊल कौतुकास्पद असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय.