लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाला बहुमत मिळाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे. यावेळी भाजपाला मिळालेल्या विजयाचा आनंद केवळ भारतातच नाही तर इंग्लंडमध्येही साजरा करण्यात आला. मोदी सरकारला मिळालेल्या यशाचा आनंद लंडनमधील रस्त्यांवर गरबा खेळून साजरा करण्यात आला. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये लंडनमधील सब-वेच्या बाहेर काही लोक गरब्याच्या गाण्यांवर थिरकताना दिसत आहेत.

आनंद महिंद्रा हे स्वत: सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह आहेत. तसेच यापूर्वीही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हातही दिला होता. नुकतेच त्यांनी ट्विटरवरून लंडनच्या रस्त्यांवर पंतप्रधान मोदींच्या विजयानंतर खेळलेल्या गरब्याचा एक व्हिडिओ शेअर केला. तसेच त्यांनी गरबा शिकण्यासाठी मदत मागितली आहे. त्यांनी आपल्या गरब्याच्या स्कील्स सुधारण्यासाठी आपल्या फॉलोअर्सना व्हिडिओच्या लिंक्सदेखील शेअर करण्याची विनंती ट्विटरवरून केली आहे. त्यांच्या ट्विटनंतर अनेक फॉलोअर्सनी त्यांना व्हिडिओच्या लिंक्सदेखील शेअर केल्या आहेत.

शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओला रिप्लाय देत आनंद महिंद्रा यांनी गरबा शिकणे खुप कठिण असल्याचे म्हटले आहे. तसेच जर या सगळ्या स्टेप्स शिकलो तर गरब्याच्या पीएचडीसाठी मी पात्र असेन विनोदी रिप्लायही त्यांनी दिला आहे. आनंद महिंद्रा हे परिस्थितीची जाण असलेले उद्योगपती म्हणून ओळखले जातातच. तसेच ते उत्तम विनोदबुद्धीसाठीही ते सर्वाच्या परिचयाचे आहेत. आनंद महिंद्रा कायमच ट्विटरवर अनेक पोस्ट शेअर करत असतात. सध्या ट्विटरवही त्यांचे जवळपास 7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. नुकतेच आनंद महिंद्रा यांनी भाजपाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत सुरुवातीच्या प्रभावशाली शंभर दिवसांची आपण वाट पाहत असल्याचेही म्हटले होते.