स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी घरातून पळालेल्या गर्भश्रीमंत मुलाला महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी इंटर्नशीपची ऑफर दिली आहे. द्वारकेश ठक्कर असं त्या मुलाचं नाव आहे. द्वारकेशच्या वडिलांचा लक्षावधींचा तेल व्यापार आहे. मात्र हा व्यापार सोडून तो एका हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे काम करत होता.

शिमलामधील एका हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे काम करून तो रात्री एका दगडावर झोपत होता. द्वारकेशसंदर्भातील एका वेबसाइटवरील बातमी शेअर करत आनंद महिंद्रांनी त्याला इंटर्नशीप देऊ केली आहे. “या मुलाचं मी कौतुक करतो. तो मेहनत करुन पुढे जाऊ इच्छितो. त्या विचारातून आता जरी त्याने घर सोडलं असलं तरी तो भविष्यात एक यशस्वी व आत्मनिर्भर उद्योगपती होऊ शकतो. मी माझ्या महिंद्रा राइज कंपनीत त्याला इंटर्नशीप देऊ इच्छितो”, असं त्यांनी ट्विटरवर लिहिलं.

आनंद महिंद्रांचं हे ट्विट वाचून द्वारकेशच्या वडिलांनीही आनंद व्यक्त केला. “माझ्या मुलाला स्वत:च्या मेहनतीने पुढे जायचंय. हेच त्याचं एकमेव स्वप्न आहे”, असं ते म्हणाले. खिशात १२५० रुपये घेऊन द्वारकेशनं घर सोडलं होतं. त्यापैकी १०७० रुपये तिकिट व २० रुपये पाण्याच्या बाटलीवर खर्च झाले. गेल्या आठवड्यात जेव्हा राकेश हे द्वारकेशला भेटले, तेव्हा त्याने शिल्लक राहिलेले १६० रुपये वडिलांना परत दिले.

आनंद महिंद्रांनी दिलेल्या ऑफरवर द्वारकेश म्हणाला, ”माझ्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. महिंद्रा राइज कंपनीच्या एखाद्या व्यक्तीशी माझा संपर्क होऊ शकला तर मी नक्कीच या ऑफरचा विचार करेन. ”

१४ ऑक्टोबर रोजी गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील गर्भश्रीमंत तेल व्यापारी राकेश यांचा मुलगा द्वारकेशने कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाला होता. मात्र तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांच्या तपासानंतर शिमलामधील एका हॉटेलमध्ये तो काम करत असल्याचं स्पष्ट झालं. कुटुंबीयांसमोर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याने घर सोडलं होतं.