महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे नेहमीच ट्विटरवर सक्रीय असतात आणि त्यांनी केलेले बहुतांश ट्विट अनेकदा चर्चेचा विषय बनतात. पुन्हा एकदा त्यांनी केलेलं ट्विट नेटकऱ्यांच्या चांगलंच पसंतीस उतरलंय.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक चिमुकला पलंगावरुन उतरण्याची खटाटोप करताना दिसतोय. पलंगाची उंची जास्त असल्यामुळे हा चिमुकला खाली उतरण्यासाठी एक भलतीच शक्कल लढवताना दिसतोय. पलंगावरील उशा तो खाली टाकतो आणि नंतर सुरक्षितरित्या त्या उशांवर तो उतरताना दिसत आहे. या लहानग्याची ही स्मार्टनेस महिंद्रा यांना चांगलीच भावली आणि त्यांनी ट्विटरद्वारे त्याच्या स्मार्टनेसचं कौतुक करत थेट नोकरीची ऑफरच देऊ केली.

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या लहानग्या मुलाला माझ्या कंपनीत घेण्यासाठी करार करु इच्छित आहे, असं ट्विट त्यांनी केलं. आमच्या सर्व प्रकल्पांचं सॉफ्ट लॅंडिंग होईल याची तो योग्य काळजी घेईल असंही त्यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.


आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटवर युजर्सनी मजेशीर रिप्लाय केले आहेत. ऐश्वर्या राजावत नावाच्या एका युजरने सर शपथ हा माझाच लहानपणीचा व्हिडीओ आहे, सांगा मी कधी कामावर कधी रुजू होऊ असं ट्विट केलं. त्यावर आनंद यांनी हा चांगला प्रयत्न होता, तुही त्या चिमुकल्याप्रमाणेच चलाख आहेस असं म्हटलं. तर श्रीकांत नावाच्या एका युजरनेही असाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ शेअर केला आणि यालाही नोकरी द्या असं म्हटलं.