विश्षचषक स्पर्धेतला बांगलादेश विरोधातला सामना भारताने २८ धावांनी जिंकला. या सामन्याची चर्चा जेवढी रंगली होती, तेवढीच चर्चा मैदानात बसून टीम इंडियाला चिअर करणाऱ्या आणि पिपाणी वाजवणाऱ्या आजींचीही होती. भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी इंग्लंडमध्ये केवळ तरूणच नाही तर आबालवृद्धांनी गर्दी केली होती. अशाच एक केस पार पांढरे झालेल्या आजीबाईंनी सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. या आजीबाई केवळ सामन्याचा आनंदच घेत नव्हत्या तर भारतीय फलंदाजांनी चौकार, षटकार मारल्यावर लहान मुलांसारखी चक्क पिपाणी वाजवून आनंद व्यक्त करत होत्या. दोन्ही गालांवर भारताचा झेंडा रंगवून पिपाणी वाजवणाऱ्या या आजींचं नाव चारूलता पटेल असे आहे. या आजींची झकल टिव्हीवर दाखवल्यानंतर काही क्षणांमध्ये ट्विटवर त्यांचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. या आजींना महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी मॅच विनर असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी या आजींना एक खास ऑफरही दिली आहे.

आनंद महिंद्रा यांनी चारूलता पटेल भारताचा सामना बघायला जाणार असतील तर त्यांच्या तिकीटांचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दाखवली आहे. आनंद महिंद्रा हे क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. अनेकदा ते ट्विटवरुन क्रिकेटसंदर्भातील ट्विट करत असतात. मात्र अनेकदा त्यांनी भारतीय संघाचे सामना बघत नाही असं सांगितलं आहे. मात्र कालच्या सामन्यादरम्यान एका खास कारणासाठी मी सामना पाहणार असल्याचे ट्विट केले होते. ‘मी सामान्यपणे भारताचे सामने पाहत नाही मात्र या आजींचा चेहरा पाण्यासाठी मी टिव्ही सुरु करणार आहे. त्या एखाद्या मॅच विनरच वाटतात,’ असे आनंद महिद्रांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

सामना संपल्यानंतर हे ट्विट कोट करत यांनी आपण सामन्याचे शेवटचे षटक पाहिल्याचे सांगितले. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘मी सामन्याचे शेवटचे षटक पाहिले. आधी तुम्हाला नखं खायला लावण्याइतके उत्कंठावर्धक सामने शेवटी तुम्ही सहज जिंकता आणि असे विजयच सर्वोत्तम असतात. शब्बास इंडिया. तसचं सामना जिंकवणाऱ्या या आजी उपांत्यफेरीच्या सामन्यांसाठी उपस्थित राहतील असं बघा. त्यांना मोफत तिकीट द्या.’

महिंद्रा यांच्या या ट्विटला एका फॉलोअरने, ‘सर तुम्हीच त्यांचे प्रायोजक का होत नाही?’ असा सवाल केला. वर आनंद महिंद्रांनी या महिलेला शोधा मी त्यांच्यासाठी भारताच्या पुढील सर्व सामन्यांच्या तिकीटांचा खर्च करेन असं ट्विट केलं. ‘त्या कोण आहेत हे शोधा आणि मी आश्वासन देतो की मालिकेतील भारताच्या इतर सामन्यांसाठीच्या त्यांच्या तिकीटांचे पैसे मी त्यांना देईन,’ असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान महिंद्रा यांनी ट्विट केले तेव्हा या आजींबद्दल कोणाला फारसे ठाऊक नव्हते. मात्र सामन्यानंतर अनेक प्रसारमाध्यमांनी तसेच आयसीसीनेही या आजींची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांचे नाव चारुलता पटेल असल्याचे समोर आले. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्या रोहित शर्माने या आजींची भेट घेतली. ट्विटरवरही #CharulataPatel हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डींग होता.