अवघ्या काही तासांमध्ये घरोघरी गणरायांची प्रतिष्ठापना होणार आहे. अनेकांनी सालाबादप्रमाणे यंदाही इकोफ्रेण्डली पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. तर बऱ्याच जणांनी पहिल्यांदाच इकोफ्रेण्डली पद्धतीने गणपतीचा पाहुणचार करण्याचा निर्णय घेतला आहे. याच इकोफ्रेण्डली गणेशोत्सवाच्या कल्पनेला पाठिंबा देताना महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी मराठी भाषेत संदेश असणारा एक फोटो ट्विट केला आहे. ‘मी दगडात नाही, मी देवळात नाही, मी झाडात आहे’ असा संदेश या फोटोमध्ये आहे. तसेच या फोटोमध्ये झाडे लावा पाणी वाचवा असा संदेशही देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिंद्रांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये एका मोठ्या झाडाच्या खोडातच गणराय साकारल्याचे दिसत आहे. कडुनिंबाच्या झाडाच्या खोडावर खडूने सोंड काढून, कागदाचे सुळे लावून, वर फेटा बांधून तर तळाच्या भागाला धोतर नेसवून आणि कान म्हणून सूप लावून गणराय साकारण्यात आले आहेत. हा फोटो ट्विट करताना आनंद महिंद्रांनी हाबर्ट रीव्स या कॅनडामधील वैज्ञानिकाचे एक वाक्य पोस्ट केले आहे. ते म्हणतात, माणसाला अनेकदा कळत नाही की त्याच्या हातून ज्या निर्सगाचा नाश होत आहे तोच देव आहे. आणि त्याचीच तो पूजा करत आहे. या फोटोबद्दल माहिती देताना हा मला व्हॉट्सअपवर फॉर्वडेड मेसेजमध्ये कोणीतरी पाठवल्याचे सांगितले. महिंद्रा हे अनेकदा व्हॉट्सअपवर आलेले फोटो #whatsappwonderbox हा हॅशटॅग वापरून ट्विट करत असतात. या आगळ्यावेगळ्या ग्रीन गणेशाबद्दल बोलताना महिंद्रांनी आपल्या आजूबाजूचा निर्सग आणि धार्मिक भावना जपण्याचा उत्तम संगम म्हणजे हा फोटो असल्याचे म्हटले आहे.

महिंद्रांनी ज्या हाबर्ट रीव्सचा दाखला आपल्या या ट्विटमध्ये दिला आहे त्याचे एक वाक्य त्यांनी काल ट्विट केले होते. मनुष्य सर्वात वेडा प्राणी आहे. तो एका अदृश्य देवाची पूजा करतो आणि एका दिसणाऱ्या निसर्गरुपी देवाला नष्ट करतो. मनुष्याला अनेकदा कळत नाही की त्याच्या हातून ज्या निर्सगाचा नाश होत आहे तोच देव आहे, अशा आशयाचे वाक्य असणारा फोटो त्यांनी रिट्विट केला होता.

ग्लोबल क्लायमेट अॅक्शन समीटसाठी आनंद महिंद्रा काल कॅलिफोर्नियाला रवाना झाले त्यावेळी त्यांनी हा फोटो ट्विट करत रीव्स यांचे हे वाक्य म्हणजे आपल्यासाठी इशारा असल्याचे ट्विटमध्ये म्हटले होते.

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra says celebrate eco friendly ganpati
First published on: 12-09-2018 at 14:51 IST