भारतीय क्रिकेट संघाने जबरदस्त कामगिरी करत ब्रिस्बेन येथील चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत इतिहास रचल आहे. भारतीय संघाने तीन गडी राखत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि २-१ ने मालिका खिशात घातली. गाबाच्या मैदानावर १९८८ नंतर पहिल्यांदाचा ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाचा सामना करावा लागला. एकीकडे विराट कोहली अनुपस्थित असताना भारतीय संघाचा व्हाइटवॉश होईल असं भाकित वर्तवणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंना भारतीय संघाने चोख उत्तर देत बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे अडचणींचा सामना करणाऱ्या भारतीय संघाच्या अविश्वसनीय कामगिरीनंतर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वांनीच भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. यामध्ये प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांचाही समावेश आहे. आनंद महिंद्रा यांनी भारतीय संघाचं कौतुक करताना ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंना खोचक सवाल विचारला आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर मायकल क्लार्क, रिकी पाँटिंग आणि मार्क वॉ यांनी केलेल्या वक्तव्यांचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये मायकल क्लार्कने विराट कोहलीशिवाय भारतीय संघ मोठ्या अडचणीत असल्याचं भाकीत वर्तवलं होतं. तर रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलिया संघाला ‘व्हाइटवॉश’ची संधी असल्याचं म्हटलं होतं. तर मार्क वॉ आणि ब्रॅड हॅडीन यांनी भारतीय संघ अ‍ॅडलेडच्या पराभवातून सावरणार नाही असं म्हटलं होतं.

आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना खोचक सवाल विचारला आहे. “तुमचे शब्द तुम्हाला कशा पद्धतीने खाण्यास आवडतील? ग्रील, फ्राइक की बेक,” अशी विचारणा आनंद महिंद्रा यानी केली आहे.

आनंद महिंद्रा यांच्या ट्विटला २० हजाराहून अधिक जणांना लाईक केलं असून मोठया प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. आनंद महिंद्राच्या ट्विटवर इंग्लंडचा खेळाडू केविन पीटरसन यानेदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय संघाला पाच कोटींचा बोनस जाहीर
सामना संपल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ट्विटरवरुन भारतीय संघाला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर बीसीसीआयच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी एक मोठी घोषणाही केली. “हा भन्नाट विजय आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन अशाप्रकारे मालिका विजय मिळवणे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायम लक्षात ठेवलं जाईल,” अशा शब्दांमध्ये गांगुली यांनी भारतीय संघाच्या विजयानंतर आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी बीसीसीआयकडून भारतीय संघाला पाच कोटींचा बोनस जाहीर केला.