महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर कायमच अॅक्टीव्ह असतात. कधी कोणाला मदतीचा हात देत तर कधी एखाद्याचे जाहीर कौतुक करत ते आपले सामाजिक भान दाखवून देतात. इतकेच नाही तर आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टीही ते सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना कळवतात. नुकतीच त्यांना त्यांच्याच कंपनीने बनवलेली Alturas G4 ही गाडी मिळाली आहे. माझ्या या TUV 3OO plus गाडीला मी ग्रे घोस्ट असे नाव दिले आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यामध्ये त्यांनी आपल्याला गाडीची किल्ली मिळतानाचा एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये मागे त्यांची नवीन काळ्या रंगाची कारही दिसत आहे.

आपल्या या सुंदर गाडीला चांगले नाव देण्यासाठी त्यांनी एक अनोखी पद्धत वापरली आहे. या गाडीला कल्पना लढवून नाव देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यामधून एक नाव निवडले जाईल आणि त्या व्यक्तीला महिंद्रांकडून खास भेट देण्यात येणार आहे. आता महिंद्रा काय भेट देणार असा प्रश्न र तुम्हाला पडला असेल तर ही भेट ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकीत व्हाल. ज्या व्यक्तीने दिलेले नाव या नव्या मॉडेलला देण्यात येईल त्या व्यक्तीला महिंद्रा कंपनीच्या २ कार भेट म्हणून देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अर्धा तासात त्यांच्या या ट्विटला असंख्य प्रतिक्रिया आल्या असून अनेकांनी आपल्या कल्पनाशक्तीला ताण देत नावे सुचवली आहेत. पण गंमत म्हणजे या भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या गाड्या खेळण्यातल्या गाड्या असणार आहेत. महिंद्रांचे हे ट्विट बऱ्याच जणांनी रिट्विटही करत आहेत. त्यामुळे तुम्हालाही महिंद्राची गाडी भेट हवी असेल तर द्या कल्पनाशक्तीला ताण.