माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी आंध्र प्रदेशमधल्या काही गावक-यांनी एकदम भन्नाट शक्कल लढवली. त्यांच्या या भन्नाट कल्पनेची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. अनेक राज्यांत माकड हा देखील उपद्रवी प्राणी म्हणून घोषीत करण्यात आला आहे. माकडांचा उच्छाद इतका वाढला आहे की शेतात घुसून पिकांची फळबागांची नासधूस करणारे हे माकड आता थेट घरातच शिरू लागले आहे आहेत. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून माकडांवर कोणतेच इलाज केले जात नाहीत हे पाहून आंध्रमधल्या गोदावरी जिल्ह्यातील अनेक गावक-यांनी शक्कल लढवली आहे. माकडांना घाबरवण्यासाठी त्यांनी शेतात आणि घराशेजारी खेळण्यातले वाघ ठेवले आहेत आणि आर्श्चय म्हणजे या खोट्या वाघोबाला पाहून माकडांचा उच्छादही कमी झाला आहे.
गोदावरी जिल्ह्यातील अनेक गावांत माकडांनी उच्छाद मांडला आहे. माकडांची टोळी पिकांची, फळबागांची नासधूस करतेच पण अनेकदा वस्तूंची चोरी देखील  करेत.  गावक-यांवर या माकडांनी हल्ला देखील केला आहे, त्यामुळे माकडांच्या उच्छादाला कंटाळून त्यांच्यावर योग्य तो इलाज करण्याची मागणी गावक-यांनी इथल्या प्रशासनाला केली होती. पण या गावांत माकडांची संख्या इतकी जास्त आहे की त्यांना पकडणे जवळपास अशक्य झाले आहे असे त्यांना सांगण्यात आले, त्यामुळे गावक-यांनी शक्कल लढवत ठिकठिकाणी खेळण्यातले वाघ ठेवले आहे. विशेष म्हणजे या खोटया वाघांना घाबरून माकडे गावात परतली नाहीत असेही इथल्या स्थानिक वृत्तपत्रांनी सांगितले आहे. २०१४ मध्ये देखील हत्तींचा उपद्रव टाळण्यासाठी गावक-यांनी अशीच खेळणी ठेवली होती पण तेव्हा  ही युक्ती फारशी कामी आली नव्हती. पण खोट्या वाघोबामुळे का होईना माकडांची डोकेदुखी तरी कमी झाली असे म्हणत गावक-यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.