क्रिकेटच्या मैदानात आपलं नाव मोठं व्हावं यासाठी अनेक खेळाडू प्रयत्न करत असतात. आतापर्यंत अनेक खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीत दिग्गज खेळाडूंना आश्चर्यचकीत केलं आहे, परंतू पुरेशी संधी न मिळाल्यामुळे हे खेळाडू कालांतराने विस्मरणात जातात. आज आपण अशा एका खेळाडूविषयी जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या देशाकडून एकही स्थानिक क्रिकेटचा सामना न खेळता थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. इतकच नव्हे तर सचिन तेंडुलकरला त्याच्या उमेदीच्या काळात शतकापासून रोखण्याची किमयाही या खेळाडूने केली आहे. मात्र कालांतराने संघाबाहेर फेकला गेल्यामुळे हा खेळाडू सध्या शिक्षकाची नोकरी करतो आहे.

९० च्या दशकात झिम्बाब्वेकडून अँडी आणि गाय व्हिटल असे दोन भाऊ खेळायचे. गाय व्हिटल हा अष्टपैलू खेळाडू होता तर अँडी व्हिटल हा ऑफ स्पिनर होता. अँडी व्हिटलने झिम्बाब्वेकडून ६३ वन-डे सामने आणि १० कसोटी सामने खेळले. आपल्या कारकिर्दीत अँडी व्हिटलला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नसली तरीही त्याची कहाणी खरंच ऐकण्यासारखी आहे. अँडी व्हिटल इंग्लंडमध्ये केंब्रिज युनिव्हर्सिटीत शिकत होता. १९९३ साली त्याने विद्यापीठाच्या संघाकडून खेळण्यास सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात त्याने ३ बळी घेतले होते. यानंतर अँडी ससेक्स संघाकडूनही खेळला. इंग्लंडमध्ये प्रथमश्रेणी सामन्यांचा अनुभव असलेल्या अँडीला झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने श्रीलंकेविरुद्ध मालिकेत संघात संधी दिली. ११ सप्टेंबर १९९६ रोजी अँडीने श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मात्र आपल्याला मिळालेल्या संधीचं त्याला फारसं सोनं करता आलं नाही.

अँडी व्हिटलने आपल्या कारकिर्दीत भारताविरुद्धही सामने खेळले. मात्र इथेही त्याला आपली म्हणावी तशी छाप पाडता आली नाही. भारताविरुद्ध ९ सामन्यांमध्ये अँडीने फक्त ३ बळी घेतले आहेत. मात्र ४ सप्टेंबर १९९९ साली कोला-कोला सिंगापूर चॅलेंज स्पर्धेत अँडीने सचिन तेंडुलकरला ८५ धावांवर बाद करत त्याच्या शतकाचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नव्हतं. पावसामुळे हा सामना २९-२९ षटकांचा खेळला गेला होता. ज्यात सचिनने ७१ चेंडूत ८५ धावांची धडाकेबाज खेळी केली होती. त्याच्या या खेळीत ३ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता.

३० जानेवारी २००० रोजी अँडीने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. यानंतर त्याला झिम्बाब्वेच्या संघात संधी मिळाली नाही. संघातून बाहेर झाल्यानंतर अँडी पुन्हा एकदा इंग्लंडला परतला आणि त्याने केंट येथील शाळेत नोकरी स्विकारली. इंग्लंडमध्ये अँडी व्हिटल सध्या गणित आणि क्रिकेटचं प्रशिक्षण देण्याचं करतो.