करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महिनाभरपासून देशात लॉकडाउन घेण्यात आला आहे. परिणामी अनेक जंगली प्राणी-पक्षांचा बाहेरील मुक्त संचार दिसून येतोय. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हत्ती आपल्या पिलांसोबत रस्त्यावरून जात असताना अचानक दुचाकी आली. दुचाकीस्वाराला पाहून हत्तीला संताप आला अन् रागाच्या भरात या हत्तीनं दुचाकीस्वाराला चक्क हुसकवून लावलं आहे. १६ सेकंदाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

या व्हिडिओत दिसतेय की, रस्त्याने जाणाऱ्या हत्तीने अचानक समोरून आलेल्या दुचाकीस्वरावर हल्ला केला. या हल्ल्यातून दुचाकीस्वराला सावरता आले नाही. दुचाकी कोसळली अन् दुचाकीस्वार खाली पडला. संतापलेला हत्ती पाहून दुचाकीस्वराने आपली दुचाकी तिथेच सोडून पळ काढला.

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतीय वन सेवा (आयएफएस) अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. ते म्हणाले की जेव्हा दुचाकीस्वाराने सुरक्षेच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले आणि हत्तीसह रस्ता ओलांडण्याचा निर्णय घेतला तेव्हा ही घटना घडली.