आयफोन व मॅक ऑपरेटींग सिस्टमसाठी ओळखल्या जाणाऱ्या अ‍ॅपल कंपनीने आता मनोरंजन क्षेत्रातही उडी घेतली आहे. त्यांनी आपले Apple TV Plus हे उपकरण बाजारात आणले आहे. हॉलिवूड दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग व अभिनेत्री जेनिफर एनिस्टन यांच्या उपस्थितीत Apple TV Plusचे अनावरण करण्यात आले. Apple TV Plus हे क्रोमकास्ट, अ‍ॅमेझॉन फायर स्टिक व एमआय बॉक्स प्रमाणेच अॅड फ्री सर्व्हिस देणारे एक व्हिडीओ स्ट्रिमींग उपकरण आहे. या उपकरणाच्या माध्यमातून नेटफ्लिस्क, अॅमेझॉन, अल्ट बालाजी, हॉट स्टार यांसारख्या ऑनलाईन वाहिन्या आपण एकाच ठिकाणी पाहू शकतो. हे उपकरण अ‍ॅपलने तब्बल १०० देशांमध्ये लॉन्च केले आहे. या देशांच्या यादीमध्ये भारताचा देखील समावेश आहे.

Apple TV Plus या उपकरणात अ‍ॅपल न्यूज, अ‍ॅपल पे व अ‍ॅपल आरकेड या विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत. अ‍ॅपल न्यूजच्या माध्यमातून आपण ३०० हून अधिक न्यूज वेबसाईट आणि मासिकं वाचू शकतो. अ‍ॅपल पे हे पेटीएम, पे यु मनी, मोमो, गुगल पे, सॅमसंग पे यांप्रमाणेच एक डिजीटल वॉलेट आहे. या ई वॉलेटच्या माध्यमातून आपण ऑनलाईन पेमेंट करु शकतो. यासाठी अ‍ॅपलने गोल्डमॅन सॅच व मास्टरकार्डशी भागीदारी केली आहे. अ‍ॅपल आर्केड ही एक गेमिंग सुविधा आहे. अ‍ॅपल आर्केडच्या माध्यमातून आपण विविध प्रकारचे ऑनलाईन गेम खेळू शकतो. परंतु हे गेम केवळ आपल्याला अ‍ॅपल उपकरणांवरच खेळता येतील.