अॅपलसारखी महाकाय कंपनी सध्या एका वेगळ्याच कारणानं त्रस्त आहे. कंपनीच्या मिटिंगमध्ये चर्चिल्या जाणाऱ्या गोष्टी, नव्या उत्पादनांचे फीचर्स गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लीक होत आहेत. अॅपल आपलं कोणतंही उत्पादन बाजारात दाखल करण्यापूर्वी त्याविषयी कमालीची गुप्तता पाळते. पण, गेल्यावर्षभरापासून अॅपलचे उत्पादन लाँच होण्यापूर्वीच त्याच्याविषयीच्या महत्त्वाच्या बातम्या बाहेर फुटत आहे त्यामुळे कंपनीनं कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. कंपनीनं कर्मचाऱ्यांना मेमो दिले आहेत अर्थात दुर्दैवानं हा मेमोदेखील बाहेर लीक झाला आहे.

‘जे कर्मचारी कंपनीच्या खासगी गोष्टी, उत्पादनं आणि सॉफ्टवेअर बद्दलची गोपनीय माहिती बाहेर लीक करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जर असं करताना एखादा कर्मचारी आढळला तर त्याची नोकरी जाईलच पण त्याचबरोबर त्याला तुरूंगवास आणि दंडही होऊ शकतो असं कंपनीनं दिलेल्या ताकीदीत म्हटलं आहे. गेल्या वर्षभरात अॅपलंनं २९ जणांवर कारवाई केली आहे. त्यातल्या १२ जणांना ताब्यात घेतलं आहे.’ असं ब्लूमबर्गनं म्हटलं आहे. पण, हे कर्मचारी कोण होते यांची नावं मात्र समजू शकली नाही. या व्यक्तींनी मिटींगमध्ये झालेल्या चर्चा, iOS बद्दलच्या महत्त्वाच्या अपडेटस, आयफोन X, आयपॅड प्रो, एअरपॉ़ड यासंदर्भातल्या माहिती २०१७ मध्ये तिसऱ्या व्यक्तीला सांगितल्या होत्या. या बदल्यात त्यांना मोठी रक्कमही मिळाली होती. ही बाब अॅपलच्या लक्षात येताच अॅपलनं कारवाईला सुरूवात केली. ‘आपण कधीही पकडले जाणार नाही असा आत्मविश्वास या लोकांना होता. पण त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला. ते कल्पनाही करू शकत नाही इतक्या वेगानं ते पकडले गेले आहेत’ असं अॅपलनं आपल्या ताकीदीत म्हटलं आहे.

यामुळे कर्मचाऱ्यांवर जरब बसेल आणि महत्त्वाची माहिती बाहेर फुटणार नाही असं कंपनीला वाटत आहे. अॅपलनं जरी कर्मचाऱ्यांना ताकीद दिली असली तरी या सूचनांचा फोटोही दुर्दैवानं कंपनीच्या बाहेर फुटला आहे त्यामुळे अॅपलची डोकेदुखी आणखी वाढली आहे.