News Flash

प्रिंटसाठी पैसे नसल्याने तरुणाने हातानेच लिहीला नोकरीचा अर्ज

नोकरीचा शोध घेण्यासाठी फिरावे लागणार असल्याने त्यासाठी येणाऱ्या खर्चाचे पैसेही त्याने आपल्या आजीकडून घेतले होते

तंत्रज्ञानाच्या काळात आपला नोकरीचा अर्ज (रिझ्युमे) वेगवेगळ्या ठिकाणी अपलोड करणे तसेच त्याच्या प्रिंट काढणे ही फार काही अनोखी गोष्ट नाही. पण अर्जेंटीनातील २१ वर्षीय मुलासाठी आपल्या अर्जाची प्रिंट काढणे ही गोष्ट काहीशी अवघड आहे. त्यामुळे कार्लोस डुआर्टे याने नोकरीसाठी एका कॅफेमध्ये अर्ज करताना हातानेच आपला अर्ज लिहीला. आता असे काय कारण असावे की ज्यामुळे त्याने हाताने आपला अर्ज लिहीला. तर अर्जाची प्रिंट काढण्याइतकेही पैसे नसल्याने त्याच्यावर ही वेळ आली आहे. इतकेच नाही तर नोकरीचा शोध घेण्यासाठी फिरावे लागणार असल्याने त्यासाठी येणाऱ्या खर्चाचे पैसेही त्याने आपल्या आजीकडून घेतले होते असे एका वृत्तपत्राने आपल्या वृत्तात म्हटले होते.

नोकरीच्या शोधात फिरत असताना त्याला एक स्थानिक कॉफी शॉप दिसले. त्याठिकाणी तो नोकरीबाबत कोणाशी बोलता येईल म्हणून अतिशय शांतपणे थांबून राहीला. त्यावेळी युजिनिया लोपेज ही या शॉपमध्ये काम करणारी महिला कर्मचारी त्याठिकाणी आली. आपल्याकडे आता नोकरीसाठी जागा नाही, पण भविष्यात जागा होणार असल्यास कळविता येईल असे सांगत तिने त्याला आपला रिझ्युमे देण्यास सांगितले. त्यावेळी आपल्याकडे प्रिंट काढण्यासाठी पैसे नसल्याने आपण हातानेच अर्ज लिहीण्याची कल्पना अवलंबली असे त्याने या कर्मचारी महिलेला सांगितले. त्याने अतिशय नीट आणि दोन वेगळ्या पेनांचा वापर करत लिहीलेला रिझ्युमे पाहून युजिनिया त्याच्यावर प्रभावित झाली आणि तिने हा अर्ज आपल्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवर शेअर केला.

युजिनियाने पोस्ट केलेला हा अर्ज काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या अर्जावर त्याने नोकरीसाठी आवश्यक असणारी सर्व माहिती लिहीली आहे. तसेच आपला संपर्क क्रमांक द्यायलाही तो विसरलेला नाही. शेवटी त्याने आपला अर्ज स्वीकारल्याबद्दल धन्यवाद देत अशाप्रकारे हाताने लिहीलेला अर्ज देत असल्याबद्दल माफीही मागितली आहे. सोशल मीडियावर हा अर्ज व्हायरल झाल्याने त्याला अतिशय कमी वेळात नोकरीसाठी अनेक ठिकाणहून बोलावणे आले आहे. त्यातील एका काचेच्या कंपनीत अखेर तो नोकरीला लागल्याचेही वृत्त सीएनएनने दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2018 6:08 pm

Web Title: argentinian man handwritten cv goes viral finally he got the job
Next Stories
1 भारतीय मसाले वाहून नेणारं जहाज ४०० वर्षांनंतर सापडलं
2 काय पण योगायोग: नोटाबंदीच्या दिवशी ठग्ज ऑफ हिंदोस्तान प्रदर्शित होणार
3 WhatsApp वर असे जाणून घ्या PNR आणि लाइव ट्रेन स्टेटस
Just Now!
X