लग्नाची तारीख आणि इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात एकाचवेळी आल्यामुळे किंग्ज इलेवनचा डावाची सुरुवात करणारा धडाकेबाज फलंदाज सुरुवातीच्या सामन्यालाच मुकणार आहेत. आठ एप्रिल रोजी किंग्ज इलेवनचा पहिला सामना आहे तर सात एप्रिल रोजी फिंच विवाहबंधनात अडकणार आहे. आयपीएलच्या शेड्युलमुळे फिंचच नाही तर त्याचा खास दोस्त असलेल्या ग्लेन मॅक्सवेललाही फटका बसणार आहे. फिंचच्या लग्नात मॅक्सवेलनं मास्टर ऑफ सेरेमनी म्हणून उपस्थित राहण्याचं मान्य केलं आहे. सात एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या मुंबई – चेन्नई लढतीनं आयपीएलचं 11 वं सत्र सुरू होत आहे. दोन दिवसांपूर्वीच आयपीएलचं शेड्युल जाहीर झालं आहे.

पंजाब किंग्ज इलेवन संघाचे कोच ब्रॅड हॉज ऑस्ट्रेलियन असल्यामुळे ते आपली अडचण समजून घेतील अशी दोघांनाही अपेक्षा आहे. तर रिकी पाँटिंग मुंबई इंडियन्सबरोबर काही काळ राहिल्यानंतर दिल्ली डेअरडेव्हिल्सना मार्गदर्शन करणार आहे. आयपीएलच्या तारखा लग्नाच्या तारखेच्या आसपास आल्यामुळे पंचाईत झाल्याची प्रतिक्रिया मॅक्सवेलने व्यक्त केली आहे.

याबाबत बोलताना फिंच म्हणाला की,”ब्रॅड हॉजचे नी आमचे खूप चांगले संबंध आहेत. ही परिस्थिती काय आहे ते हॉज जाणतातच. आणि तीन वर्षे पंजाबमधून खेळल्यानंतर अवघा एक सामना उपलब्ध नसेल ते ही लग्नाच्या कारणामुळे तर ते समजून घेतलं जाईल. त्यामुळे काही आभाळ कोसळणार नाहीये.”

तर ग्लेन मॅक्सवेल म्हणाला की,”आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की आयपीएल 15 एप्रिलपासून सुरू होईल. त्यानंतर आम्हाला कळवण्यात आलं की त्याआधीच आयपीएल सुरू होणार आहे. परंतु फिंचचं लग्न सात एप्रिलरोजी करण्याचं आधीच ठरवण्यात आलं आणि त्याबाबत आता काही करणं शक्य नाहीये.”