जम्मू-काश्मीर आणि लडाखबाबत मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या रस्त्यांवर चक्क शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे पोस्टर झळकल्याचं समोर आलं आहे. अशाप्रकारचे पोस्टर पाहून पाकिस्तानचे पोलिसांमध्येही गोंधळ उडाला. हे पोस्टर हटवण्यात तेथील पोलिसांना जवळपास पाच तासांचा वेळ लागला. महत्वाची बाब म्हणजे हे बॅनर्स ज्या भागात लावले गेले होते तेथून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे. बॅनर्स ज्या ठिकाणी लावले गेले होते, त्याठिकाणी लगतच्या इमारतींवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासले जात असून त्याआधारे हे बॅनर्स कोणी लावले याचा शोध घेतला जात आहे. सोशल मीडियावर हे पोस्टर्स आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त करत तेथील नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दलच प्रश्न उपस्थित केलेत.

काय आहे पोस्टर –
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक भाषण केले होते. “आज जम्मू काश्मीर घेतले आहे, उद्या बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरही घेऊ, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करतील, असा मला विश्वास आहे” , अशी गर्जना त्यांनी राज्यसभेत केली होती. राऊत यांच्या या भाषणानंतर इस्लामाबादमध्ये राज्यसभेत भाषण करतानाचा त्यांचा फोटो आणि त्यावर ‘महाभारत – स्टेप फॉरवर्ड’ असे लिहिलेली पोस्टर्स लागली. विशेष म्हणजे या पोस्टर्सवर राऊत यांनी केलेल्या आक्रमक विधानाचाच वापर करण्यात आला होता. याघटनेने पाकिस्तानात खळबळ उडाली होती, अशाप्रकारचे पोस्टर लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं, अखेर पोलिसानी ते पोस्टर हटवले असून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया – तर, “पाकिस्तानात पोस्टर्स लागल्याबाबत आश्चर्य वाटले, शिवसेनेचे पोस्टर्स इस्लामाबादमध्ये लागणे हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय आहे, इस्लामाबादमध्येही शिवसेना पोहोचली असून शिवसेनेचे चाहते तेथे आहेत हे नक्की”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

पाहा व्हायरल व्हिडिओ –

 

पाकिस्तानातील एका ट्विटर युजरने हा व्हिडिओ ट्विट केला आहे.