पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसासाठी लखनऊमधली एका कलाकाराने पंतप्रधान मोदींचं ११० फूट उंच कटआऊट तयार केलं आहे. जुल्फीकार हुसैन असं या कलाकाराचं नाव असून या कटाआऊटचे काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. १७ सप्टेंबर रोजी मोदींचा वाढदिवस आहे, त्यामुळे मोदींसाठी त्यांनी ही खास कलाकृती निर्माण केली आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार सध्या दुबईत वास्तव्यास असलेले हुसैन ही कलाकृती साकारण्यासाठी भारतात आले आहेत. लखनऊमध्ये असणाऱ्या भाजप कार्यालयाबाहेर १७ सप्टेंबरला ही कलाकृती उभारण्यात येणार आहे. भाजप नेते नृपेंद्र पाण्डेय यांच्या विनंतीस मान देऊन हुसैन यांनी ही कलाकृती तयार केलीय. काही वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हुसैन आणि नृपेंद्र पाण्डेय मिळून मोदींच्या वाढदिवशी १५०० किलो मिठाईचेदेखील वाटप करणार आहेत.

वाचा : अवघ्या पाच वर्षांच्या मुलीचा विक्रम; ११ मिनिटे १९ सेकंदात १०३ वेळा अचूक नेम

कलाकृतीच्या उंचीप्रमाणे मोदी सरकार देखील ११० वर्षे सत्तेतच राहू दे अशी इच्छाही हुसैन यांनी यावेळी व्यक्त केली. पण त्याचवेळी आपण एक कलाकार आहोत आणि कोणात्याही विचारधारेला माझा पाठिंबा नाही अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली. माझं काम माझ्या धर्माशी जोडू नका अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ८० च्या दशकात ते चित्रपटाचे पोस्टर रंगवण्याचं काम करायचे. याआधी हुसैन यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचं १०० फूट उंच कटाऊट साकारलं होतं.