‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातील पोस्टमनची पत्र लिहिणारे प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी आपल्या नवीन ब्लॉगमधून सर्वसामान्य मराठी माणूस आणि राजकारण या विषयावर भाष्य केलं आहे. जगताप यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन सावधान! सावधान! नावाच्या मथळ्याखाली लिहिलेल्या या ब्लॉगची लिंक शेअर केली आहे. “प्रश्न ठाकरे की फडणवीस हा नसला पाहिजे. प्रश्न नौकरी का उद्योगधंदा हा असला पाहिजे. आणि दोन्हीपैकी एकतरी उत्तर मिळालं पाहिजे,” अशी ओळ पोस्ट करत यांनी आपला ब्लॉग फेसबुकवर शेअर केलाय.

अरविंद जगताप यांनी आपल्या ब्लॉगमधून मराठी माणसाच्या सध्याच्या परिस्थितीवर परखड मत व्यक्त केलं आहे. “मराठी माणसांचा महाराष्ट्र. हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा सह्याद्री म्हणून पाठ थोपटून घेणारे आपण. पण आपल्या राज्यात वीज, मोबाईल, अन्नधान्याची दुकानं यासारख्या व्यवसायात मराठी माणूस औषधाला नसेल तर हे कशाचं लक्षण आहे?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसेच, “मराठी माणूस व्यवसायात मागे का आहे यावर फक्त चर्चाच होतात. कृती होत नाही. अगदी अगदी छोट्या गावात सचोटीने व्यवसाय करणारे व्यापारी अमराठी आहेत. त्यांची एकी आहे. एकमेकांना धरून राहण्याची वृत्ती आहे. आपल्या लोकांना भांडवल पुरवण्याची तयारी आहे. साधा भंगार सामानाचा व्यापार बघा, लाकडांच्या वखारी बघा, देशी दारूचा व्यवसाय बघा ठराविक नावं दिसतात वर्षानुवर्ष. मोठमोठ्या बिल्डर्सची नावं बघा. मुंबईतल्या प्रमुख पन्नास उद्योगपतींची यादी बघा. देश आपला आहे. अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. मोठे होतात. व्हायलाच हवेत. पण मराठी माणूस या सगळ्यात कुठे आहे?,” असा प्रश्न जगताप यांनी आपल्या ब्लॉगच्या सुरुवातीलाच उपस्थित केलाय.

prakash amedkar narendra modi
“…तर आम्ही भाजपा-आरएसएसबरोबर जाऊ शकतो”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
eknath shinde devendra fadnavis
सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय? शिंदे गटाचा संतप्त सवाल; नेमकं प्रकरण काय?
mahendra thorve dada bhuse news
विधानभवनात शिंदे गटाचे आमदार थेट मंत्र्यांनाच भिडले; कारण विचारताच म्हणाले, “…म्हणून माझी दादा भुसेंशी बाचाबाची झाली!”
pet dog helped the owner to plant a tree Emotional Video
अरे देवा! मदत करायला गेला अन् मालकाचं काम वाढवून आला; VIDEO चा शेवट पाहून पोट धरून हसाल

मराठी माणूस उद्योगधंद्यात मागे असण्यासंदर्भातील कारणांबद्दल बोलताना जगताप यांनी, “मराठी माणूस उद्योगधंद्यात मागे आहे याला इतर धर्मांचे, राज्याचे लोक कारण आहेत असं अजिबात नाही. स्वतःच्या राज्यात इतर लोक प्रगती करू देत नाहीत असं म्हणणं म्हणजे वेडेपणा होईल. मराठी माणूस स्वतःच्या अधोगतीला कारण आहे. एकतर आपल्या मुख्यमंत्र्याची निवड कायम दिल्लीतून होत आली. त्यामुळे दिल्लीच्या कलाने कारभार करणे चालू राहिले. आपल्या नेत्यांच्या तक्रारी करण्यासाठी कायम मराठी नेते दिल्लीत असायचे. एकदा एक माजी पंतप्रधान महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करायला आले होते म्हणे. पण स्थानिक नेत्यांनी त्यांना बदामाचा शिरा दिला खायला. एकदम भारी बडदास्त ठेवली. पंतप्रधान हैराण झाले. त्यांना प्रश्न पडला इथे कसला आलाय दुष्काळ? हे लांगुलचालन वरचेवर वाढत गेलं. आपले उद्योगधंदे शेजारच्या राज्यात गेले तरी आपण शब्द काढला नाही. मराठी माणूस राजकारण निवडणुकीपुरते ठेवत नाही. ते चोवीस तास जगू लागतो. राजकारण हाच कायम उद्योग होऊन बसल्यावर माणसं उद्योगधंद्यात मोठी कशी होणार?,” असा प्रश्न सर्व मराठी जनांना विचारला आहे.

राजकीय संस्थानांची मक्तेदारी जास्त भयंकर

राजकीय संस्थानांची मक्तेदारी जास्त भयंकर असल्याचेही जगताप यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. “शिवाजी महाराजांनी अनेक दूरदर्शी निर्णय घेतले होते. त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी वतनदार वठणीवर आणले होते. त्यांना मनमानी करायची परवानगी नव्हती. पण नंतर ती पद्धत बंद झाली. गेल्या कित्येक वर्षात राज्यातल्या नेतृत्वाने प्रत्येक तालुका कुणाला तरी आंदण दिलाय. त्यामुळे राजकीय वतनदारी सुरु झाली. घराणेशाही मजबूत झाली. इंदिरा गांधींनी संस्थानाचे अधिकार काढून घेतले. पण राजकीय संस्थानांची मक्तेदारी सुरु झाली. जी जास्त भयंकर आहे. पक्ष, विचारधारा यापेक्षा कित्येक तालुके, जिल्हे एखाद्या राजकीय घराण्याचे गुलाम बनले. हे सत्ता असलेल्या कुठल्याही पक्षात घुसून बसणारे नवे संस्थानिक इंग्रजांपेक्षा भयंकर जुलुमी बनले. आजही कित्येक मतदारसंघात ठराविक नेत्यांचे फोटो प्रत्येक ठिकाणी लागलेले दिसतात. त्यांच्या गाड्या आल्यावर बाकी लोकांनी गाड्या बाजूला घ्यायच्या असतात. त्यांच्यापेक्षा महागडी गाडी कुणी घ्यायची नसते. त्यांच्यापेक्षा मोठं घर बांधायचं नसतं. अशा नेत्यांच्या मतदाराने मोठा उद्योग उभा करावा ही अपेक्षा आपण ठेवणार कशी? अशी माणसं सामान्य माणसांना मोजेनाशी होतात. गुंड मवाली आणि खंडणीखोर लोक भोवती गोळा करतात. मग मतदारसंघातल्या सगळ्या उद्योजकांकडून हप्ते वसुली सुरु होते. अशावेळी मराठी माणसाची मानसिकता बनते की कुणाच्या डोळ्यात यायचं नाही. आपण भले आपलं काम भलं. मग गुंतवणूक नको. मोठे उद्योग नको. गाड्या नको. रिस्क नको. पर्यायाने कुठेतरी नोकरी केलेली बरी. कायम हेच चालू राहिलं,” असं स्थानिक पातळीवरील राजकारणाबद्दल बोलताना जगताप सांगतात.

एकी असणे म्हणजे इतर प्रांतांच्या लोकांना विरोध करणे नाही. एकी असली…

“एका मोठ्या मराठी उद्योगपतीने मुलाखतीत सांगितलं होतं, त्याच्या कंपनीत कामाला असणाऱ्या इंजिनियरचे लग्न जमत होते. कारण त्यांना नोकरी होती. पण कंपनीचा मालक असलेल्या त्या उद्योगपतीला कुणी मुलगी द्यायला तयार नव्हतं. कारण काय तर त्याला पर्मनंट नोकरी नाही. कंपनी असली म्हणून काय झालं? ती बुडाली तर उद्या? आता काय बोलणार? मराठी माणसाला उद्योगधंद्याला प्रोत्साहन देणारी एखादी यंत्रणा सुद्धा एवढ्या वर्षात उभी होऊ शकली नाही,” अशी खंत जगताप यांनी व्यक्त केली आहे. “बहुतेकवेळा दिल्लीने लादलेल्या माणसांना आपला नेता म्हणायची वेळ आली. दक्षिणेतल्या राज्यात अशी प्रथा नव्हती. अजूनही फारशी नाही. कारण भाषा, प्रांत याबाबतीत असलेली एकी. देशासाठी एकत्र येताना पहिली परीक्षा असते तुम्ही तुमच्या तुमच्यात एकी दाखवू शकता का? आपण आपसात एकत्र यायला नेहमी कमी पडतो. एकत्र येणे म्हणजे इतर प्रांतांचा द्वेष करणे नाही. एकी असणे म्हणजे इतर प्रांतांच्या लोकांना विरोध करणे नाही. एकी असली की आपल्या समस्या कळतात. एकीकडे लाखो परप्रांतीयांना रोजगार देणाऱ्या राज्यात कुपोषण आहे याच भानही कित्येकांना नाही. फडणवीस का ठाकरे या प्रश्नावर भांडणारे आपण, पण आपल्याला लाखो बेरोजगार तरुणांची, लाखो बेरोजगार शिक्षकांची, लाखो कंत्राटी कर्मचाऱ्यांची, लाखो स्पर्धा परीक्षेची वाट पाहणाऱ्या तरुणांची काहीच पडलेली नाही. त्यांच्यासाठी कुणी भांडायचं? त्यासाठी एकी पाहिजे? प्रश्न ठाकरे की फडणवीस हा नसला पाहिजे. प्रश्न नोकरी का उद्योगधंदा हा असला पाहिजे. आणि दोन्हीपैकी एकतरी उत्तर मिळालं पाहिजे. हे विचार कायम आपल्या सगळ्यांच्या डोक्यात येत असतात,” असंही जगताप यांनी म्हटलं आहे. ब्लॉगच्या शेवटी त्यांनी झेंडा चित्रपटातील सावधान… सावधान वणवा पेट घेत आहे, या गाण्यातील काही ओळी लिहिल्या आहेत.