जीवघेण्या करोना व्हायरसचा संसर्ग कमी व्हावा यासाठी नागरिकांना मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पण तरीही अनेक ठिकाणी याचं सर्रास उल्लंघन होताना दिसतं. अशा व्यक्तींवर पोलीस प्रशासनाकडून कारवाईही होते. पण तरीही अनेकजण मास्क न घालता फिरतात.

मास्क न घालणाऱ्यांना  धडा शिकवण्यासाठी आता उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्हा प्रशासनाने एक अनोखी शिक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार फिरोजाबादमध्ये आता मास्क न घालणाऱ्यांना शिक्षा म्हणून चक्क ५०० वेळेस ‘मास्क लगाना है’ असं वाक्य लिहावं लागणार आहे. ‘मास्क की क्लास’ नावाची ही अनोखी शिक्षा नियमाचं उल्लंघन केलेल्यांना केली जाणार आहे.

‘मास्क की क्लास’ मध्ये पोलीस काही कारवाई करणार नाहीत. पण मास्क न घालणाऱ्यांना एका ठिकाणी तीन-चार तास बसवलं जाईल. “मास्क की क्सासमध्ये मास्क न घालणाऱ्यांना पहिल्यांदा व्हिडिओद्वारे मास्क घालण्याचं महत्त्वं सांगितलं जाईल. त्यानंतर एका कागदावर ५०० वेळेस मास्क लगाना है असं लिहायला सांगितलं जाईल”, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षक सचिंद्र पटेल यांनी दिली. वारंवार सांगूनही मास्क न घालणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या सहकाऱ्याने हा निर्णय घेतला आहे.