इंडोनेशियामध्ये सुरु असणाऱ्या एशियाडच्या नवव्या दिवशी भारतीय क्रीडारसिकांसाठी नीरज चोप्रा एक नवी पहाट घेऊन आला. भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवत नीरजने या खेळात भारताचा ध्वज मोठ्या अभिमानाने फडकावला. फक्त सुवर्ण पदकच नव्हे तर नीरजने राष्ट्रीय विक्रमाला गवसणीही घातली. त्याने या स्पर्धेत आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ८८.०६ मीटरची सर्वोकृष्ट फेक केली.

अवघ्या वीस वर्षांच्या वयात नीरजची ही कामगिरी पाहून संपूर्ण क्रीडाविश्वातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. नीरजच्या भाल्याने घेतलेल्या या सुवर्णवेधाची दखल दुग्धजन्यपदार्थांच्या उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या अमूल समुहातर्फेही करण्यात आली आहे.

वाचा : Asian Games 2018: सिंधूने रौप्यपदक जिंकल्यानंतर तिचे वडील म्हणतात…

अमूलने नीरजच्या विजयाला त्यांच्याच अनोख्या आणि मोठ्या कलात्मकपणे साजरा केलं आहे. ज्यामध्ये अमूलची प्रसुद्ध बाहुलीच थेट एशियाडच्या मैदानावर पोहोचली असून, ती नीरजला शुभेच्छा देत असल्याचं पाहायला मिळत आहे. आशियाई स्पर्धांमध्ये भालाफेक स्पर्धेत अशी उल्लेखनीय कामगिरी कररणारा नीरज पहिला भारतीय खेळाडू ठरला. या आधी भारताला या स्पर्धेत भालाफेक या क्रीडाप्रकरात कधीही सुवर्णपदक कमावता आलं नव्हतं. पण, नीरजच्या ऐतिहासिक कामगिरीने सेही साध्य करुन दाखवत भारताला भालाफेकमधील पाहिलंवाहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं.