गेल्या महिन्यात सोशल मीडियावर व्हायरल झालेला मुंबईतल्या रस्त्यावरचा व्हिडिओ तुम्हाला आठवतोय का? पावसामुळे रस्त्यात पाणी साचलं होतं आणि गुडघाभर पाण्यात काही तरूण चक्क रस्त्याच्या मधोमध उभे राहून मासेमारी करत होते. असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला आसामच्या राष्ट्रीय महामार्गावर.

आसाममधल्या एका पत्रकारानं हा व्हिडिओ अपलोड केला आहे. कालियाबोर इथल्या राष्ट्रीय महामार्गावरचा हा व्हिडिओ आहे. पूरामुळे सगळीकडे पाणी साचलं होतं आणि या पाण्याबरोबर मोठा मासाही वाहून आला. रस्त्यावर आलेल्या मोठ्या माशाला पाहून सुरूवातीला लोक गोंधळले, घाबरलेही. पण नंतर काही माणसांनी वाचवून या माशाला सुरक्षित स्थळी सोडले. हा मासा इतका मोठा होता की रस्त्यावर जमलेल्या अनेकांना तो नीट पकडताही येत नव्हता. गेल्या काही दिवसांपासून आसामला पूराचा तडाखा बसला आहे. पूरामुळे एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. ठिकठिकाणी गुडघाभर पाणी साचलंय. अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. कित्येक लोक बेघर झालेत, पण आपण मात्र या साऱ्या परिस्थितीपासून अनभिज्ञच आहोत.

पुराचा जेवढा फटका माणसांना बसलाय तेवढंच नुकसान वन्यजीवांचंही झालं, पुरामुळे अनेक प्राणी मृत्यूमुखी पडले आहेत. या संपूर्ण पूरग्रस्तस्थितीवर आसामच्या एका गायकानं व्हिडिओ तयार करून लक्ष वेधण्याचा प्रयत्नही केला होता.