आसाममधील नागाव येथे राहणाऱ्या निहारिका दास या महिलेची सध्या सोशल नेटवर्किंगवर तुफान चर्चा आहे. अनेकजण या महिलेचं कौतुक करत आहे. निहारिकाचा एक फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. या फोटोमध्ये निहारिका आपल्या सासऱ्यांना स्वत:च्या पाठीवरुन रुग्णालयात नेताना दिसत आहे. अनेकांनी निहारिकाला आदर्श सून असं म्हटलं आहे. सोशल नेटवर्किंगवर निहारिकाचा फोटो व्हायरल झाला असून ‘सून असावी तर अशी’, असं अनेकांनी म्हटलं आहे.

२४ वर्षीय निहारिकाने आपल्या ७५ वर्षीय आजारी सासऱ्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कोणीच मदत करत नसल्याने स्वत:च त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या सासऱ्यांना पाठीवर बसवून ती दोन किलोमीटर अंतर पायी चालत रुग्णालयात पोहचली. मात्र करोना पॉझिटिव्ह असणाऱ्या सासऱ्यांना दाखल करुन त्यांच्यावर उपचार होईपर्यंत तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिला फिरावं लागलं.

नक्की वाचा >> कहर… गप्पा मारता मारता नर्सने पाच मिनिटांमध्ये एकाच व्यक्तीला दिले करोना लसीचे दोन डोस

निहारिकाचे सासरे थुलेश्वर दास हे राहा येथील भाटीगावमधील सुपारी विक्रेता आहेत. निहारिका तिच्या पतीसोबत सिलीगुडी येथे काम करते. २ जून रोजी थुलेश्वर यांची तब्बेत अचानक बिघडली आणि त्यांच्यामध्ये करोना संसर्गाची लक्षणं दिसू लागली. निहारिकाने सासऱ्यांना दोन किमी अंतरावर असणाऱ्या आरोग्य केंद्रावर नेण्यासाठी प्रयत्न सुरु केला. तिने एका रिक्षावाल्याशी संपर्क करुन त्याला घराजवळ येण्यास सांगितलं. मात्र बराच वेळ रिक्षावाला आलाच नाही आणि नंतरही त्याच्याशी काहीच संपर्क झाला नाही. त्यावेळी निहारिकाला मदत करण्यासाठीही घरात कोणी नव्हते. म्हणून तिने स्वत: सासऱ्यांना पाठीवर घेऊन दोन किमीवर असणाऱ्या आरोग्य केंद्रावर चालत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र रस्त्यामध्ये अन्य एका रिक्षावाल्याच्या मदतीने ती केंद्रावर पोहचली. रिक्षामधून उतरुन चालण्याची ताकदही थुलेश्वर यांच्यात नसल्याने निहारिकाने त्यांना पुन्हा पाठीवर घेत आरोग्य केंद्रात नेलं.

नक्की वाचा >> करोना हे सरकारचं षडयंत्र, रोगप्रतिकारशक्ती कमी असणारे लोक मास्क लावतात : महंत नरसिंहानंद

मात्र आरोग्य केंद्रावर गेल्यानंतर तिथे थुलेश्वर यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नागावमधील करोना रुग्णालयामध्ये दाखल करण्यास सांगण्यात आलं. पुन्हा निहारिकाने एका खासगी गाडीची व्यवस्था करुन सासऱ्यांना कोव्हिड रुग्णालयामध्ये नेलं. मात्र थुलेश्वर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना करोना रुग्णालयाऐवजी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यास सांगण्यात आल्याने निहारिकाने पुन्हा त्यांना गाडीमधून सरकारी रुग्णालयात नेलं. तिथे सुद्धा ती त्यांना पाठीवरुनच आतमध्ये घेऊन गेली. यासाऱ्या गोंधळामध्ये निहारिकाने दिवसभरात मी किमान दोन किमी अंतर सासऱ्यांना पाठीवर घेऊन चालले असेल, असं इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं.

मात्र एवढे कष्ट घेऊनही थुलेश्वर यांचे प्राण वाचले नाहीत. दाखल केल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच ५ जून रोजी थुलेश्वर यांचं निधन झालं. निहारिकाची चाचणी करण्यात आली असता ती सुद्धा करोना पॉझिटिव्ह आलीय. सध्या निहारिका क्वारंटाइन आहे. निहारिका तिच्या सासऱ्यांना पाठीवर बसवून आरोग्य केंद्रात नेत असताना अनेकजण तिचे फोटो काढत होते. मात्र तिच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. याच फोटोंपैकी एक फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय.

नक्की वाचा >> धक्कादायक! आयसोलेशनला कंटाळलेल्या करोना पॉझिटिव्ह सासूने सुनेला मिठी मारुन केलं बाधित

आपल्या सासऱ्यांच्या निधनामुळे निहारिकाला प्रचंड दु:ख झालं आहे. “ते मला छोटी सूनबाई असं म्हणायचे. ते उपचारादरम्यान शुद्धीवर होते. मी त्यांना आमचा व्हायरल झालेला फोटोही दाखवला होता. लोक काय म्हणतील अशी चिंता त्यांना वाटत होती. त्यानंतर मी त्यांना लोक आपलं कौतुक करत असल्याचं सांगितलं. तेव्हा त्यांनी मला पाठीवर घेऊन रुग्णालयात जाण्याची ताकद तुझ्यात कुठून आली असा प्रश्न विचारला होता, त्यानंतर आम्ही बराच वेळ हसत होतो,” असं निहारिका म्हणाली.