करोनाचा सर्वाधिक फटका आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना बसला आहे. हातावर पोट असणाऱ्या अनेक मजुरांनी पायी चालतच आपल्या मूळगावी परण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तर दुसरीकडे अनेकांना रोजच्या जेवणाची सोय करण्यासाठी काम शोधण्यापासूनचे कष्ट घ्यावे लागत आहेत. काही ठिकाणी तर मुलांनाही आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मदत करावी लागत आहे. आसाममधील अशाच एका मुलीला पोलिसांनी भन्नाट भेटवस्तू दिली आहे.
आसामच्या दिब्रूगड जिल्ह्यातील बोगीबीलमधील साफकती घोगरा गाव येथे राहणारी जनमोनी गोगोई ही मुलगी कुटुंबाचा उदर्निवाह चालवण्यासाठी सायकलवरुन गावामध्ये भाजीविक्री करते. जनमोनी हिने दिब्रूगड येथील सरकारी शाळेमध्ये १२ वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं आहे. जनमोनीला पुढेही शिकण्याची इच्छा आहे. मात्र घरीची आर्थिक परिस्थिती आधीच हलाकीची असताना करोनामुळे आर्थिक संकट अधिक वाढले आहे. त्यामुळेच या संकटामध्ये कुटुंबाला मदत करण्याची जनमोनीने अत्यावश्यक सेवेमध्ये येणाऱ्या भाजीची विक्री करण्याचा निर्णय घेतला. ती सायकलवरुन भाजी विकू लागली. सायकलच्या हॅण्डलला दोन्ही बाजूने मोठ्या पिशव्या लावून ती चालतच सायकलवरुन भाजी बाजारात घेऊन जाऊ लागली. तिचे भाजी नेतानाचे अनेक फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले होते.
जनमोनीच्या संघर्षाची कथा काही दिवसांपूर्वी सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिच्यासाठी मदतीचा हात पुढे केले. आसाम पोलिसांनीही सोमवारी थेट जनमोनीच्या घरी जाऊन तिला टीव्हीएसची मोपेड भेट दिली. यासंदर्भातील फोटो पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाऊण्टवरुन पोस्ट केले आहे. “कुटुंबाला मदत करण्यासाठी जनमोनी सायकलवरुन भाज्या विकते. आसामचे पोलीस महासंचालकांची दिलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही अर्थव्यवस्थाला हातभार लावण्यासाठी काम करत या मुलीच्या स्वालंबनाला सलाम करण्यासाठी ही छोटी भेट दिला देत आहोत,” असं पोलिसांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. पोलीस उपअधीक्षिका पल्लवी मुजुमदार यांच्या हस्ते जनमोनीला ही दुकाची देण्यात आली.
Janmoni Gogo sells vegetables on a bicylcle to fend for her family. Inspired by her self respect & guided by our visionary @DGPAssamPolice Sir’s direction to transform ourselves from police force to facilitators of economy, DYSP HQ gifted the little entrepreneur a moped / bike pic.twitter.com/kncyhRQEr9
— Dibrugarh Police (@dibrugarhpolice) May 11, 2020
“या मुलीबद्दल आम्हाला कळलं तेव्हा आम्ही तिला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. मात्र तिने याला स्पष्ट नकार दिला. शेवटी पोलीस खात्याने एकत्र येऊन तिला एक दुकाची भेट देण्याचा निर्णय घेतला,” असं मुजुमदार यांनी सांगितलं. “मी दिब्रुगड पोलिसांची आभारी आहे. त्यांनी केलेल्या मदतीमुळे मला भाजी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे सोपे होणार आहे,” असं मत जनमोनी हीने व्यक्त केलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 14, 2020 12:57 pm