पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्तपत्ती कशी झाली याबद्दल वैज्ञानिकांमध्ये मतमतांतरे आहेत. काही वैज्ञानिकांच्या मते पृथ्वीवर आदळलेल्या लघुग्रहामुळे सजीवांची निर्मिती झाली. तर काही वैज्ञानिकांच्या मते पाण्यामधील सूक्ष्म जिवाणूंच्या माध्यमातून पृथ्वीवर जीवसृष्टी उदयास आली. पृथ्वीवर सजीव वनस्पती आणि प्राणी कसे निर्माण झाले याबद्दल एकमत नसल्यानेच यासंदर्भात संशोधक आजही वेगवेगळे संशोधन करताना दिसतात. असेच एक संशोधन नुकतेच समोर आले असून हे संशोधन आपण आतापर्यंत सजीव सृष्टीच्या उतपत्तीबद्दल करत असलेल्या विचारांहून अगदीच वेगळे आहे.

जपानमधील टोहोकू युनिव्हर्सिटी, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मटेरियल्स सायन्स आणि सेंटर फॉर हाय-प्रेशर सायन्स अँड टेक्नॉलॉजी अ‍ॅडव्हान्स रिसर्च तसेच ओसाका विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन पृथ्वीवरील जीवसृष्टीचा उगम कसा झाला यासंदर्भात संशोधन केलं आहे. या संशोधकांनी सादर केलेल्या अहवालानुसार पृथ्वीवरील समुद्रात कोसळलेल्या एका लघुग्रह (अ‍ॅस्टेरॉईड) माध्यमातून पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्पत्ती झाल्याचा दावा करण्यात आला आहे.  या संसोधनाची माहिती नेचर्स डॉटकॉमवर उपलब्ध आहे.

हे संशोधन करताना संशोधकांनी पृथ्वीवरील समुद्रात जेव्हा एखादा लघुग्रह आदळतो तेव्हा काय होतं याचा अभ्यास केला. यासाठी त्यांनी प्रयोगशाळेमध्येच एक प्रतिकृती तयार करुन निरिक्षणे नोंदवली. कार्बनडाय ऑक्साइड, नायट्रोजन, पाणी आणि लोह यांचा एकमेकांवर कसा परिणाम होतो यासंदर्भातील अभ्यास संशोधकांनी केला. लघुग्रह आदळल्यावर निर्माण होणाऱ्या उर्जा निर्माण करण्यासाठी त्यांनी या प्रयोगात  सिंगल स्टेज प्रोपेलंट गनची मदत घेतली.

जेव्हा लघुग्रह समुद्राच्या पाण्यावर आदळतो तेव्हा निर्माण होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेमधून ग्लायसीन आणि अ‍ॅलनीनची निर्मिती होते. एखादी जीवशास्त्रासंबंधित प्रक्रिया करण्यासाठी चालना देणारे हे दोन्ही घटक आहेत. या प्रयोगामध्ये त्यांनी कार्बन आणि नायट्रोजन गॅसचा वापर करण्यामागेही एक विशेष कारण होते. ४०० कोटी वर्षांपूर्वी म्हणजेच जेव्हा पृथ्वीवर सजीवसृष्टी निर्माण झाली असं मानलं जातं त्या काळामध्ये पृथ्वीचा बहुतांश भाग हा कार्बन आणि नयट्रोजननेच बनलेला होता.

“मिथेन आणि अमोनिया सारख्या संयुगे तयार करणारे सेंद्रीय रेणू बनवणे कठीण नाही, परंतु त्या वेळी वातावरणातील या घटकांचे प्रमाण अगदीच किरकोळ होते असे मानले जाते. कार्बन डायऑक्साईड आणि मॉलिक्युलर नायट्रोजनपासून तयार झालेल्या अ‍ॅमिनो अ‍ॅसिडमुळे पृथ्वीवर जीवन निर्माण संयुगे एकत्र आली. यामधूनच या सर्व घटनेचे महत्त्व किती आहे दिसून येते,” असं टोहोकू युनिव्हर्सिटीतील या संशोधनाचे लेखक योशिरो फुरुकावा सांगतात.

याच प्रयोगाच्या आधारे मंगळावरही जीवसृष्टी होती यासंदर्भात संशोधन करणे शक्य होणार असल्याचे संशोधक सांगतात.