अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेत (नासा) अंतराळवीर असलेल्या क्रिस्टिना कोच या नुकत्याच अंतराळात ३२८ दिवस वास्तव्य करुन अमेरिकेतल्या टेक्सास येथे आपल्या घरी परतल्या. त्यांना समोर पाहिल्यानंतर त्यांची लाडकी कुत्री ल्युकीलीनं मोठ्या उत्साहानं त्यांच स्वागत केलं. याचा व्हिडिओ कॅमेरॅत कैद झाला असून हा व्हिडिओ कोच यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला, त्यावर युजर्सच्या अनेक भावनिक कमेंट्सचा पाऊस पडला.

या व्हिडिओमध्ये कोच यांच्या पाळीव कुत्रीनं जेव्हा कोच आणि त्यांच्या पतीला घराकडे येताना पाहिलं तेव्हा ती खूपच उत्साहित झाली होती. त्या क्षणी ती दरवाजावर आपल्या पायाच्या नखांनी ओरखडत राहीली आणि जेव्हा कोच यांनी घरात पाऊल टाकलं तेव्हा या कुत्रीच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. ती आनंदाच्या भरात उड्या मारायचं थांबतच नव्हती आणि एकसारखी आपली शेपटी हालवत होती.

हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना क्रिस्टिना कोच यांनी त्याखाली एक भावनिक कॅप्शनही दिलं. त्यांनी म्हटलं की, “मला कळतं नाहीए की नेमकं कोण इतकं उत्साहित झालं आहे. मला याचा आनंद आहे की वर्षभरानंतरही तीनं मला ओळखलं.”

‘हा इतका प्रेमळ व्हिडिओ पाहिल्यांनतर माझे अश्रूच थांबेनात’ अशी प्रतिक्रिया एका ट्विटर युजरने दिली आहे. कोचच्या या व्हिडिओवर नासाच्या अधिकृत ट्विटर हँडलनेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा व्हिडिओ म्हणजे सर्वकाही आहे’, अशी प्रतिक्रिया एकानं ट्विटरवर दिली. ‘हाच खरा आनंद’ असं एकानं म्हटलंय. ‘ही भावना खूपच मौल्यवान आहे’ अशीही एकानं प्रतिक्रिया दिली. ‘कुत्र्यांचं हृदय हे खूपच प्रेमळ आणि खरं असतं. ते कधीच आपल्या लोकांना विसरत नाहीत,’ असंही एकानं म्हटलं आहे. या व्हिडिओला ट्विटरवर एका दिवसात २.८ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.