सोशल मिडियावर दोन मोठ्या कंपन्यांनी एकमेकांवर कुरघोडी करणे आता नेटकऱ्यांसाठी नवीन राहिलेले नाही. याच कुरघोडीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला तो बीएमडब्यू आणि ऑडी या कंपन्यांमध्ये ट्विटवर रंगलेल्या ट्विट युद्धाचा. जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाच्या कारनिर्मिती करणाऱ्या दोन्ही कंपन्यांमध्ये बीएमडब्यूने पोस्ट केलेल्या एका फोटोवर जुंपली.

बीएमडब्यूच्या अमेरिकेतील ट्विटर हॅण्डलवरून (@BMWUSA) एम फोर या सुपरकारचा मरीन ब्लू रंगामधील फोटो ट्विट करण्यात आला. या फोटोच्या मागे आतषबाजी होताना दाखवण्यात आली होती. ‘Sparks fly for this #M4 in exclusive Yas Marina Blue’ अशी ओळ या फोटोबरोबरच्या मजकूरामध्ये ट्विट करण्यात आली होती. आता यामध्ये योगायोगाने गाडीमागे उडत असणाऱ्या आतषबाजीमुळे तयार झालेल्या प्रकाश वलयांमुळे एकात एक अडकलेले गोल आकार दिसत होते. बीएमडब्यूची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी कंपनी असणाऱ्या ऑडीचा लोगोही असाच आहे.

त्यामुळेच ऑडीच्या ट्विटर हॅण्डलवरून लगेचच When you see it… म्हणजेच जेव्हा तुम्ही या फोटोकडे नीट पाहाल अशा आशयाचे ट्विट केले. अर्थात या ट्विटमधून त्यांना बीएमडब्यूच्या गाडी मागे तयार झालेल्या ऑडी कंपनीच्या लोगोशी साधर्म्य साधणाऱ्या वर्तुळाकार रोषणाईकडे फॉलोअर्सचे लक्ष्य वेधून घ्यायचे होते.

आता असा शाब्दिक चिमटा काढल्यानंतर बीएमडब्यू याला काय उत्तर देणार अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगू लागली. ऑडीने केलेल्या ट्विटला हजारो लाईक्स मिळाले. अखेर ऑडीने केलेल्या खोचक ट्विटला बीएमडब्यूच्या ट्विटर हॅण्डलवरून १६ तासांनंतर रिप्लाय देण्यात आला. पण हा रिप्लाय खरोखरच देर आऐ दुरुस्त आऐ अशाप्रकारातील होता असचं त्याला मिळालेल्या प्रतिसादावरून म्हणावे लागेल. बीएमडब्यूने ‘We see it, where we usually do… in the rear view mirror.’ असा तगडा रिप्लाय ऑडीला दिला. म्हणजेच ‘हो आम्हाला दिसतय नेहमीसारखचं रेअर व्ह्यू मिररमध्ये’ असा टोमणाच बीएमडब्यूने लगावला. तुम्ही कायम आमच्या मागेच असता म्हणून आम्हाला तुमचा लोगो आमच्या गाडीच्या रेअर व्ह्यू मिररमध्ये दिसत आहे असेच काहीसे बीएमडब्यूला सुचवायचे होते.

एकंदरीतच काय तर एका फोटोवरून सुरु झालेल्या वादातून या दोन्ही कंपन्यांनी अगदी मोजक्या शब्दात एकमेकांची अगदी लायकीच काढली. तरी बीएमडब्यूच्या या स्मार्टनेसवर नेटकरी फिदा झाले आहेत. अनेकांनी या ट्विटर वादामध्ये बीएमडब्यू जिंकल्याचा कौल दिला आहे.

एक नंबर रिप्लाय

मला वाटतं बीएमडब्यू जिंकले

वाटतं होत ऑडी जिंकतील पण…

…म्हणून मला बीएमडब्यू आवडते

संपलं सगळं

या दोन मोठ्या कंपन्यांमध्ये ट्विटवर झालेल्या शाब्दिक युद्धांची सर्वात जास्त मज्जा त्यांच्या फॉलोअर्सनेच घेतली.