औरंगाबाद येथे बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थीनीनं आयुष्यात शिक्षणाला फार महत्व आहे हे दाखवून दिलं आहे. लग्नाच्या दिवशी अर्थशास्त्राचा पेपर असल्यानं ही नवरी लग्नमंडपात उशीरा पोहोचली. नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी देखील भर मांडवात तिची वाट पाहत होते. ती लग्नमंडपात दोन तास उशीरा पोहोचली मात्र सगळ्यांनी तिचं टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत केलं.

हरसुल गावात राहणाऱ्या २० वर्षीय रेणुका पवारचे लग्न ठरलं होतं. एका सामूहिक विवाह सोहळ्यात शंकर नावाच्या मुलाशी तिचा विवाह होणार होता. पण त्याच दिवशी रेणुकाची १२वीची परीक्षा होती. लग्न ठरताच रेणुकानं परीक्षा पाहून लग्नाची तारीख काढण्यास सांगितली होती. मात्र तिच्या बोलण्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. गरीब घरात जन्मलेल्या रेणुकाला वडिलांच्या मृत्यूनंतर कठीण परिस्थिचा सामना करावा लागला होता. अशी परिस्थिती आयुष्यात पुन्हा ओठवू नये म्हणून तिने शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. शिक्षणामध्ये कोणताही अडथळा येणार नाही याची खबरदारी देखील घेतली होती.

शनिवारी परीक्षा देऊन रेणुका लग्न मांडवात उशिरा पोहोचली. लग्नासाठी उपस्थित असलेल्या वऱ्हाडींनी तिचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. त्यानंतर काही वेळातच रेणुका आणि शंकर विवाह बंधनात अडकले.