बॉल टॅम्परिंग प्रकरणात ऑस्ट्रेलियन खेळाडूंचं नावं येणं काही नवं नाही. यापूर्वी केपटाऊन येथे झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूने सॅण्डपेपरचा वापर करून चेंडू सोबत छेडछाड केल्याचा प्रकार घडला होता. परंतु आताही ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यावरून धडा धेतल्याचे दिसत नाही. रविवारी ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्यात रंगलेल्या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झॅम्पा याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये दिसत असलेल्या हालचालींमुळे तो संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून तो चंडूबरोबर छेडछाड करत असल्याचा आरोप नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

ओव्हल मैदानावर रंगलेल्या सामन्यादरम्यान झॅम्पा आपल्या खिशातून काहीतरी काढून ते चेंडूवर घासताना दिसत आहे. त्याच्या या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून बॉल टॅम्परिंगचा संशय नेटकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या कॅमरुन बॅनक्रॉफ्टने गेल्यावर्षी केपटाऊनमधील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान सॅण्डपेपरच्या सहाय्याने चेंडूसोबत छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला होता. टॅम्परिंगप्रकरणी बॅनक्रॉफ्ट, डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव स्मिथ यांना बॉल टॅम्परिंगप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर ब्रेनक्राफ्टवर नऊ महिन्यांची तर वॉर्नर आणि स्मिथवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती.

रविवारी भारताविरूद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात झॅम्पाने सहा षटकं टाकली होती. तसंच त्याने 50 धावा देत एकही विकेट घेता आली नव्हती. या सामन्यात भारताने उत्कृष्ट फलंदाजी करत 352 धावांचा डोंगर उभा केला होता. दरम्यान, याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 316 धावांवर संपुष्टात आला होता.