विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडलेड कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहली भारतात परतणार आहे. पत्नी अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी आणि आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मादरम्यान परिवारासोबत राहण्यासाठी बीसीसीआयने विराटला रजा मंजूर केली आहे. विराट आणि अनुष्काच्या बाळाचा जन्म जानेवारी महिन्यात होणार आहे. अनुष्काबरोबर वेळ घालवता यावा, तिची काळजी घेता यावी म्हणून विराट पहिल्या कसोटीनंतर भारतात येतोय. मात्र विराटने अशाप्रकारे तीन कसोटी सामने शिल्लक असताना परतण्याचा निर्णय घेणं अनेकांना पटलेलं नाही. विराटच्या या निर्णयावर नाराज झालेल्या एका ऑस्ट्रेलियन महिला अँकरने त्याला एक मजेदार सल्ला दिला आहे.

ऑस्ट्रेलियातील महिला क्रिकेट अँकर अशणाऱ्या क्लॉय अमांडा बेलीने विराट आणि अनुष्काला ऑस्ट्रेलियामध्ये येऊन बाळाला जन्म देण्याचा सल्ला दिलाय. असं झाल्यास हे बाळ भविष्यात ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळेल आणि येथील सर्वोत्तम फलंदाज होईल असंही क्लॉयने म्हटलं आहे. बरं ही मागणी करताना क्लॉयने एक भन्नाट मिम शेअर करत विराट अनुष्काकडे ही मागणी केलीय. क्लॉयने शेअर केलेलं मीम हे हेराफेरी चित्रपटामधील अभिनेता परेश रावलने साकारलेल्या भूमिकेचं म्हणजेच बाबू भय्यांवर आधारित आहे. यामध्ये बाबू भय्या ‘मस्त प्लॅन हैं’ असं सांगत आहेत.

“मी विराट कोहली असतो तर परत भारतात परतलो नसतो”

पहिल्या कसोटीमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतरही विराटने मालिका अर्ध्यात सोडून परतण्याचा निर्णय घेतल्यावर मतमतांतरं असल्याचं चित्र दिसून येत आहे.  भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप दोशी यांनी मी विराट कोहली असतो तर परत भारतात परतलो नसतो, असं मत व्यक्त केलं आहे. “मला कल्पना आहे की सध्या नवीन युगातला हा विचार आहे आणि अनेक लोकांना हा पटतोही. मलाही याची चांगली कल्पना आहे. पण ज्यावेळी तुम्ही भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करत असता आणि या परिस्थितीत मी स्वतःला ठेवून पाहिलं तर मी ऑस्ट्रेलियावरुन परतलो नसतो. माझ्यासाठी देशाचं प्रतिनिधीत्व करणं ही गोष्ट सर्वात आधी येते. बाकीच्या गोष्टी त्याच्या नंतर,” असं दोशी म्हणाले आहेत.

गावस्कर संतापले

भारताच्या क्रिकेट संघात अद्यापही भेदभावाला स्थान आहे. त्यामुळेच प्रमुख खेळाडूंच्या सोयीनुसार नियमांत बदल केले जातात, असे परखड मत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त करताना कर्णधार विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. तसेच अशा प्रकारच्या भेदभावामुळे संघ व्यवस्थापन काय दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतावर दारुण पराभवाची नामुष्की ओढवली. त्यातच कोहली पितृत्वाच्या रजेमुळे मायदेशी परतल्याने भारताची अवस्था अधिक बिकट झाली आहे. त्यामुळे २६ डिसेंबरपासून रंगणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीच्या पार्श्वभूमीवर गावस्कर यांनी विविध खेळाडूंसाठी लागू करण्यात आलेले विविध नियम संघासाठी कसे घातक ठरत आहे, अशी टीका गावस्कर यांनी केलीय.