आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या ऑस्ट्रेलियातील एका इमामने करोनाची लस न घेण्याचं आवाहन केलं आहे. लस घेणं म्हणजे इस्लामच्या दृष्टीने हराम असल्याचा दावाही या इमामने केला आहे. ऑक्सफर्ड आणि अस्त्राझेनेका तयार करत असलेली करोना लस मुस्लिमांनी घेऊ नये असं या इमामने पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे. अशाप्रकारे लस घेणं हे आपल्या धर्मामध्ये निषिद्ध मानलं जातं असा दावा या इमामने केला आहे.

पर्थ येथील मशीदीमध्ये प्रार्थना सांगणारे इमाम सुफियान खलीफा यांनी युट्यूबवर मुस्लिमांना आवाहन करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. “ऑस्ट्रेलियन मुस्लिमांनी एकत्र येण्यासाठी संदेश : प्रेषितांचा मार्ग निवडा”, अशा मथळ्याचा व्हिडिओ या इमामने पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये करोनाचा लस बनवण्यासाठी कंपनीने कोणत्या पद्धतीचा वापर केला आहे याबद्दलची माहिती आपण देत असल्याचे सांगण्यात आलं आहे.

“लस वापरण्याचे समर्थन करणाऱ्या काही मुस्लिम संस्थांची लाज वाटते. यासंदर्भात फतवा जारी करणाऱ्या कोणत्याही इमामाचा निषेध असो,” असं म्हणतच या व्हिडिओमध्ये खलीफाने लसीला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. “ही लस म्हणजे हराम असल्याचे ठाऊक असल्यानेच कॅथलिक याविरोधात उभे राहिल्याचे दिसत आहे. हे कायद्याच्या विरोधात आहे. मात्र तुम्ही याबाबतील सरकारबरोबर उभं राहण्याचा निर्णय घेत असला तर विचार करा,” असं पर्थमधील हा इमाम व्हिडिओत बोलताना दिसतो.

मात्र अशाप्रकारे करोना लसीला हराम असल्याचे सांगणारा खलीफा हा एकमेव इमाम नाही. ऑस्ट्रेलियामध्ये निर्माण केल्या जाणाऱ्या अस्त्राझेनेकाच्या करोना लसीला विरोध करणाऱ्या धार्मिक व्यक्तींची संख्या वाढताना दिसत आहे. मेल ऑनलाइनमधील वृत्तानुसार सिडनीमधील कॅथलिक मुख्य बिशप, अँगलिकॅन मुख्य बिशप आणि ग्रीक ऑर्थडॉक्सचे मुख्य बिशपने पंतप्रधानांना करोना लसीसंदर्भात पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी करोना लसीचे २५ मिलियन डोस तयार करण्यासंदर्भातील सरकारच्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करण्यात यावा असं म्हटलं आहे.

करोना लसीसंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आपण चिंतेत असल्याचं एका वरिष्ठ बिशपने सांगितलं आहे. करोनाच्या लसीमध्ये गर्भाशयाशी संबंधित पेशींचा वापर केला जात असून त्यामुळे ख्रिश्चनांसमोर नैतिक पेच निर्माण होऊन वंशाला धोका निर्माण होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे.

वाढता विरोध लक्षात घेऊन सरकारी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात आपण तपास करत असून जास्तीत जास्त ऑस्ट्रेलियन व्यक्तींना करोना लसीचा लाभ घेता येईल अशी लस निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केलं आहे. करोनाची लस बनवण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धत ही अयोग्य असून दुसऱ्या पद्धतीने लस निर्माण करण्यासंदर्भात विचार करण्याची मागणी वेगवेगळ्या चर्चमधील बिशपने केली आहे.