जगाच्या शाळेत वावरायचं असेल तुम्हाला अस्खलित इंग्रजी वाचता, बोलता येणे गरजेचे आहे असे सर्रास म्हटले जाते. त्यातच जर एखादा फॉरेनर तुमच्या समोर उभा राहिला तर मग काही बघायलाच नको. कारण बहुतांश परदेशी नागरिकांना इंग्रजी भाषा सोडून अन्य कोणत्याच भाषा फारशा येत नसल्याचे दिसून येतं. अगदी काही हाताच्या बोटावर मोजता येतील अशा परदेशी नागरिकांना हिंदी भाषा तोडकीमोडकी समजते. मात्र अशाच एका परदेशी नागरिकाने हा गैरसमज खोडून काढला आहे. त्याला केवळ हिंदी भाषा समजतच नाही तर बोलतादेखील येते.

अस्खलित इंग्लिश बोलणा-या एका परदेशी व्यक्तीच्या तोंडून अचानक हिंदी किंवा भोजपुरी शब्द ऐकले तर कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. हा धक्का एका ऑस्ट्रेलियन नागरिकाने दिला आहे. या व्यक्तीने इंग्लिश बोलत असताना अचानक भोजपुरी भाषा सुरु केल्यामुळे उपस्थित सर्वच जण त्याच्याकडे पाहत बसले. या घटनेचा साक्षीदार म्हणून एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ६ लाख लोकांनी पाहिला असून १९ हजारापेक्षा अधिक शेअर करण्यात आला आहे.

हा ऑस्ट्रेलियन नागरिक एका महिलेशी इंग्लिशमध्ये बोलत असताना अचानक हिंदी आणि भोजपुरीमध्ये बोलू लागला. त्याच्या या उत्तम हिंदी आणि भोजपुरी बोलण्यामागील कारण विचारल्यानंतर ख-या घटनेचा खुलासा झाला. हा परदेशी नागरिक १०७२ ते १९७८ या सहा वर्षाच्या कालावधीत उत्तर प्रदेश आणि बिहार या भागात राहिला होता. त्यामुळे त्याला ब-यापैकी भोजपुरी भाषा येऊ लागली होती. उत्तर प्रदेश आणि बिहार येथून पुढे ते बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका यासारख्या ठिकाणी ते कामानिमित्त राहिले होते. त्यामुळे त्यांना हिंदीदेखील ब-यापैकी येते. त्यांची हिंदी ऐकल्यावर कोणालाही ते विदेशी असल्याचे खोटे वाटेल. मात्र इंग्लिशबरोबरच त्यांची हिंदीवरही तेवढीच पकड आहे.

त्यांच्या तोंडून हिंदी शब्द ऐकल्यावर त्यांना अनेक जणांनी ते भारतीय आहेत का असा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र त्यांनीदेखील मजेमध्ये मी काश्मीरी पंडित असल्याचे सांगितले. मात्र या एकंदरीत प्रकारावरुन हे नक्कीच सिद्ध झाले की कोणतीही गोष्ट अशक्य नाही.