भारतीय संस्कृतीप्रमाणे आपल्या खाद्यसंस्कृतीचीही जगभरात चर्चा केली जाते. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये अशीच चर्चा पहायला मिळतेय. कारण, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी स्वतः चक्क समोसे बनवले आणि ट्विटरद्वारे हातात समोसे असलेला फोटो शेअर केलाय. यासोबत मॉरिसन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आपल्या ट्विटमध्ये टॅग केलं. त्यांच्या या ट्विटवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रिप्लाय दिलाय.

रविवारी स्कॉट मॉरिसन यांनी समोशांना ‘स्कॉमोसा’ असं नाव दिलं आणि “आंब्याच्या चटणीबरोबर संडे ‘स्कॉमोसा’…या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत होणारी बैठक समोरा-समोर बसून पार पडली असती तर हे समोसे त्यांच्यासोबत शेअर केले असते…कारण ते शाकाहारी आहेत”, अशा आशयाचं ट्विट केलं. त्यांनी दोन फोटो शेअर केले. एका फोटोत ‘ट्रे’मध्ये समोसे आणि चटणी दिसतेय तर दुसऱ्या फोटोमध्ये समोशांवर कोथिंबीरीची सजावट करण्यात आलेली दिसतेय. त्यांचं हे ट्विट आणि फोटो लगेच व्हायरल झाले आणि पंतप्रधान मोदींनीही त्यावर प्रतिसाद दिला आहे.

“आपण हिंदी महासागरामुळे जोडले गेलो आहोत, तर भारतीय समोशामुळे एकत्र आहोत….करोना व्हायरसविरोधात विजय मिळवल्यावर आपण एकत्र समोशांचा आनंद घेऊ….”, अशा आशयाचं ट्विट मोदींनी केलं आहे. तसेच, ‘समोसे फारच स्वादिष्ट दिसत आहेत…’ असं म्हणत मोदींनी स्कॉट यांनी बनवलेल्या समोशांचं कौतुक केलंय.


दरम्यान, येत्या 4 जून रोजी मोदी आणि मॉरिसन यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे द्विपक्षीय चर्चा होणार आहे. या चर्चेत सैन्य, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात द्विपक्षीय करार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.