‘नावात काय आहे?, हे इंग्रजीमधील थोर नाटककार आणि लेख विल्यम शेक्सपीअर याचं वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल. मात्र याच नावामुळे ऑस्ट्रीयामधील एक गाव कायमच टीकेचं धनी ठरलं आहे. गावाच्या नावावरुन अनेकजण या गावातील गावकऱ्यांची थट्टा करायचे आणि त्यांच्याबद्दल अश्लील भाषेत वक्तव्य करायचे. मात्र आता या नेहमीच्या त्रासाला कंटाळून या गावाने आपलं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षापासून हे गाव नव्या नावं ओळखलं जाणार आहे.

ऑस्ट्रीयामधील व्हिएन्ना येथून साडेतीनशे किलोमीटरवर असणाऱ्या या गावाची लोकसंख्या केवळ १०० इतकी आहे. या गावाचं नाव एवढं विचित्र आहे की त्याचं नाव गुगलवर सर्च करताना पुढे देशाचं नाव टाकलं नाही तर तुम्हाला सर्च रिझल्टमध्ये अनेक आपत्तीजनक फोटो दिसतील आणि अर्थात त्यापैकी एकही गावाशी संबंधित नसेल. या गावाचं नाव सर्च करताना गावाच्या नावाबरोबरच देशाचं नवं म्हणजे ऑस्ट्रीया (Austria) असं सर्च केलं तरच गुगलवर हे गाव सापडतं. आता तुम्ही नक्कीच विचारात पडला असाल की असं काय नाव आहे या गावाचं. तर या गावाचं नाव आहे फकिंग (Fucking). अर्थात आता हे नाव अवघ्या काही दिवसांपुरतं राहणार आहे. स्थानिक प्रशासनाने गावकऱ्यांना विश्वासात घेऊन गावाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता गावाचं नाव फगींग (Fugging) असं ठेवण्यात येणार आहे. स्थानिक भाषेमध्ये गावाच्या सध्याच्या नावाचा उच्चार ज्या पद्धतीने केला जातो तसंच त्याचं स्पेलिंग करुन घेण्यात येणार आहे. त्यामुळे उच्चारामध्ये काही विशेष फरक पडणार नसून कागदोपत्र नाव बदललं जाणार आहे.

या गावामध्ये येणारे पर्यटक अनेकदा येथील स्थानिकांना गावाच्या नावावरुन अनेक मजेदार प्रश्न विचारतात तर कधीकधी मस्करी करतात. या गावाच्या रस्त्यांवरील गावाचं नाव असणाऱ्या पाट्यांचे फोटो काढून ते सोशल नेटवर्किंगवर व्हायरल केल्याचे प्रकारही घडले आहेत. हे गाव ज्या महापालिकेच्या हद्दीत येतं त्या महापालिकेच्या महापौर अ‍ॅण्ड्रीया होल्जेनर यांनी द गार्डीयनशी बोलताना गावाचं नाव बदलणार असल्याचं वृत्त खरं आहे असं म्हटलं आहे. या संदर्भात आधीच प्रसारमाध्मयांनी विषयाला फाटे फोडले आहेत. त्यामुळे गावाचं नाव बदलणार आहे एवढचं मी सांगू शकते असं महापौरांनी म्हटलं आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२१ पासून हे गाव अधिकृतरित्या फगींग म्हणून ओळखले जाणार आहे.